मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेने वातानुकूलित लोकलच्या संख्येत आणखी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सामान्य लोकलच्या फेऱ्या बंद करून वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या वाढविण्यास प्रवासी आणि संघटनांकडून विरोध वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे आणि प्रवासी संघटनांमध्ये वादाची ठिणगी पडण्याची चिन्हे आहेत.
मध्य रेल्वेवरील सामान्य लोकलच्या फेऱ्यांवर घाला घालून वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या सुरू करण्याच्या निर्णयाबाबत प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. असे असतानाच पायाभूत सुविधा लक्षात घेऊन मध्य रेल्वेने वातानुकूलित लोकलच्या फेऱ्यांमध्ये आणखी वाढ करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. वातानुकूलित लोकल फेऱ्यांना प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून या लोकलच्या फेऱ्यांमध्ये आणखी वाढ करण्यात येईल, अशी माहिती पश्चिम रेल्वे रेल्वेच्या जनसंपर्क विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, सामान्य लोकलच्या फेऱ्या रद्द करू नये असेे गाऱ्हाणे प्रवासी संघटनांनी पुन्हा एकदा रेल्वे प्रवाशांनाकडे मांडले आहे.
मध्य रेल्वेवर वातानुकूलित लोकलच्या प्रतिदिन ६६ फेऱ्या होतात. यापैकी ३२ फेऱ्या सामान्य लोकलच्या बदल्यात चालवण्यात येतात. तर पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकलच्या ४८ पैकी बहुतांश फेऱ्या या सामान्य लोकल फेऱ्यांच्या बदल्यात चालवण्यात येत आहेत. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांची गैरसोय होत असून याबद्दल मध्य रेल्वे प्रवासी तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत. कळवा, बदलापूर येथे प्रवाशांनी आंदोलनही केले. तर लोकप्रतिनिधींनीही आंदोलनाचा इशारा दिला.त्यामुळे ६६ फेऱ्यापैकी १० फेऱ्या रद्द करून मध्य रेल्वेला सामान्य फेऱ्या पूर्ववत कराव्या लागल्या.
यासंदर्भात मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी, रेल्वे मंत्रालयाने मे महिन्यात वातानुकूलित लोकलचे प्रवासी भाडे कमी केले. त्यामुळे वातानुकूलित सेवांतील फेब्रुवारी २०२२ मधील दैनंदिन सरासरी प्रवासी संख्या पाच हजार ९३९ वरून ऑगस्ट २०२२ मध्ये ४१ हजार ३३३ वर पोहोचली. त्यात जवळपास सात पट वाढ झाली. वाढत्या पायाभूत सुविधा लक्षात घेऊन वातानुकूलित लोकलच्या संख्येत आणखी वाढ करण्यात येईल, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी स्पष्ट केले.
अलिकडेच एका दिवसात एक लाख प्रवाशांनी वातानुकूलित लोकलमधून प्रवास केला होता. यावरून प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट होते. प्रवाशांकडून वातानुकूलित लोकल फेऱ्या वाढवण्याची मागणी होत आहे. त्यामुळे या लोकलच्या फेऱ्यांमध्ये आणखी वाढ करण्याचा विचार करत असून तसे नियोजनही सुरू असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी सांगितले.
सामान्य लोकलच्या फेऱ्या रद्द न करता वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात अशी मागणी मध्य रेल्वेकडे करण्यात आली आहे. अन्यथा प्रवाशांनी आंदोलन केले तर त्याला रेल्वे प्रशासन जबाबदार असेल. तसेच पासचे दरही कमी करावेत. – नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्था
वातानुकूलित लोकल चालवण्यास आमचा विरोध नाही. मात्र सामान्य लोकल फेऱ्यांवर गदा येता कामा नये. या फेऱ्या रद्द करुन वातानुकूलित लोकल चालवू नये, असे वारंवार प्रशासनाला सांगण्यात येत आहे. – सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल यात्री परिषद