गु्न्हेगारीला आळा घालण्यासाठी, तसेच आपत्कालीन परिस्थितीत महिला प्रवाशांना तात्काळ मदत मिळावी या उद्देशाने लोकलमधील महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे आणि टॉक बॅक यंत्रणा बसविण्याचा निर्णय पश्चिम आणि मध्य रेल्वेने घेतला आहे. मात्र सध्या ही सुरक्षा यंत्रणा बसविण्याचे काम धीम्या गतीने सुरू आहे. दरम्यान, पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या लोकलमधील महिलांच्या २११ डब्यांमध्ये सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यास मंजुरी मिळाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मध्य रेल्वेने ११४ लोकलच्या महिला डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम फेब्रुवारी २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे.

हेही वाचा- ठाणे खाडीत फ्लेमिंगोची लगबग; सध्या ७० हजार ते १ लाख रोहित पक्ष्यांचे आगमन

सीसी टीव्ही कॅमेऱ्यामुळे लोकलमधील गुन्ह्याचा उलगडा होण्यास मदत मिळते. तसेच डब्यातील टॉक बँक यंत्रणेद्वारे महिला प्रवासी गार्ड किंवा मोटरमनशी संवाद साधून तात्काळ मदत मागू शकते. या दोन्ही प्रकल्पांसाठी पश्चिम रेल्वेला १२३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तीन – चार वर्षांपूर्वी लोकलमध्ये ही यंत्रणा बसवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला होता. मात्र त्याचा गैरवापर होण्याची शक्यता, खर्च, यंत्रणा हाताळण्यासाठी गार्ड, मोटरमनसोबतच रेल्वे सुरक्षा दलावर पडणारा ताण इत्यादी कारणांमुळे टॉक बॅक यंत्रणेचा विस्तार करण्यात येणार नाही, असे पश्चिम रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले होते. येत्या काही वर्षांत वातानुकूलित लोकल गाड्य़ा दाखल होत असून ही यंत्रणा केवळ याच गाडय़ांमध्ये असेल, असेही स्पष्ट करण्यात आले होते. परंतु वातानुकूलित लोकल प्रकल्प काहीसा मागे पडला असून त्यामुळे सीसी टीव्ही कॅमेरे व टॉक बॅक यंत्रणा योजनेला गती देण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेने घेतला आहे.

हेही वाचा- ठाणे-भिवंडी-कल्याणची कनेक्टीव्हीटी वाढवणाऱ्या ‘मेट्रो ५’ च्या पहिल्या टप्प्याचे ७० टक्के काम पूर्ण; पाहा फोटो

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या ताफ्यात सध्या ९३ लोकल असून यापैकी केवळ सातच लोकल वातानुकूलित आहेत. विनावातानुकूलित लोकलमधील महिलांच्या १२९ डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तर महिलांच्या २९ डब्यांमध्ये आणि ७० सामान्य डब्यांमध्ये टॉक बॅक यंत्रणा बसविण्यात आली आहे. याची व्याप्ती आणखी वाढविण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. महिलांच्या उर्वरित २११ डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यास मंजुरी मिळाल्याचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले. तर महिलांच्या आणि सामान्य (जनरल) एक हजार ११६ डब्यांमध्ये टॉक बॅक यंत्रणा बसवण्याचे कामही प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा- मुंबई: पशुवैद्यकीय रुग्णालयासाठी निश्चित केलेल्या जागेचा अखेर ई लिलाव

मध्य रेल्वेनेही या प्रकल्पाला गती देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. सध्या ४२ लोकलमधील महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे आणि महिलांच्या ५२ डब्यांमध्ये पॅनिक बटण यंत्रणा आहे. ११४ लोकलमधील महिलांच्या डब्यात सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम फेब्रुवारी २०२४ पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. तर पॅनिक बटण यंत्रणा बसवण्याचे कामही प्रगतीपथावर आहे.

Story img Loader