मुंबई : मुंबई महानगरात तापमानाचा पारा प्रचंड वाढला असून सामान्य लोकलमधून प्रवास करणे तापदायक ठरत आहे. रेल्वे प्रवासात प्रवाशांना उन्हाचे तीव्र चटके सहन करावे लागत आहेत. घामाच्या धारांनी मुंबईकरांना नकोसे झाले आहे. लोकलमधील धक्काबुक्की, गर्दीतून प्रवास करावा लागत आहे. यातून सुटका मिळविण्यासाठी हजारो प्रवासी वातानुकूलित लोकलचा पास आणि तिकीट काढतात. परंतु, पश्चिम रेल्वेने शुक्रवारी १३ वातानुकूलित लोकल फेऱ्या रद्द केल्या आहेत. या वातानुकूलित लोकलऐवजी सामान्य लोकल धावणार आहेत. त्यामुळे खिशात वातानुकूलित लोकलचा पास असूनही प्रवाशांना सामान्य लोकलमधून प्रवास करावा लागणार आहे.

मागणीमुळे संख्या वाढवली… पण

पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांचा प्रवास आरामदायी, गर्दीमुक्त आणि गारेगार व्हावा यासाठी वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या. पश्चिम रेल्वे प्रशासनाने २७ नोव्हेंबर २०२४ रोजी १३ अतिरिक्त वातानुकूलित लोकल फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकल फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९ वर पोहोचली. या लोकल फेऱ्यांमधून सुमारे १.२६ लाख प्रवासी प्रवास करतात. परंतु, पश्चिम रेल्वेने शुक्रवारच्या अप आणि डाऊन मार्गावरील एकूण १३ वातानुकूलित लोकल फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात प्रवाशांना उन्हाच्या तीव्र झळा, गर्दीतून प्रवास करावा लागणार आहे. वातानुकूलित लोकलचे तिकीट, पास असलेल्या प्रवाशांना सामान्य लोकलने प्रवास करावा लागणार आहे. मागील बुधवारीही डाऊन ७ फेऱ्या आणि अप ५ फेऱ्या अशा १२ वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. वारंवार वातानुकूलित लोकल रद्द करण्यात येत असल्याने पश्चिम रेल्वेच्या या निर्णयाविरोधात प्रवाशांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे.

‘या’ वातानुकूलित लोकल सामान्य लोकल म्हणून धावणार

सकाळी १०.५३ वाजताची चर्चगेट – विरार जलद लोकल

सकाळी ११ वाजताची विरार – चर्चगेट जलद लोकल

दुपारी १२.३४ वाजताची चर्चगेट – विरार जलद लोकल

दुपारी २.०५ वाजताची विरार – चर्चगेट जलद लोकल

दुपारी ४.४५ वाजताची भाईंदर – अंधेरी जलद लोकल

सायंकाळी ५.२५ वाजताची अंधेरी – विरार जलद लोकल

सायंकाळी ६.३० वाजताची विरा – वांद्रे धीमी लोकल

सायंकाळी ७.५२ वाजताची वांद्रे – भाईंदर धीमी लोकल

रात्री ९.१५ वाजताची भाईंदर – चर्चगेट जलद लोकल