मुंबई : पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकलमध्ये बिघाड होत असल्याने प्रवाशांचा प्रवास गैरसोयीचा होत आहे. तिकिटाची अधिक किंमत मोजूनही प्रवाशांना सामान्य लोकलमधून प्रवास करण्याची वेळ येत आहे. वातानुकूलित लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने बुधवारी सुमारे पाच वातानुकूलित लोकल फेऱ्यांऐवजी सामान्य लोकल फेऱ्या चालवण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांनी पश्चिम रेल्वे प्रशासनाबाबत प्रचंड संताप व्यक्त केला.
पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकलला प्रवाशांचा प्रतिसाद प्रचंड आहे. त्यामुळे या लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात ७ रेक असून या रेकच्या ९६ एसी लोकल फेऱ्या होतात. मात्र, अनेकदा वातानुकूलित लोकलमध्ये बिघाड होण्याच्या घटना घडत आहेत. वातानुकूलित लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सुमारे १३ वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या रद्द करण्याचे नियोजित केले. मात्र, तांत्रिक बिघाड दूर केल्यानंतर नियोजित रद्द केलेल्या फेऱ्यांपैकी ८ वातानुकूलित लोकल फेऱ्या चालवल्या आणि पाच फेऱ्या रद्द केल्या. त्याऐवजी पाच सामान्य लोकल चालवण्यात आल्या. त्यामुळे वातानुकूलित लोकलचे तिकीट काढलेल्या प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. त्यांनी पश्चिम रेल्वेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.
चर्चगेट येथे लोकल सेवा खोळंबा
पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्याने बुधवारी दुपारच्या सुमारास प्रवाशांना प्रवास करताना विलंबाचा सामना करावा लागला. दुपारी १.५२ च्या सुमारास चर्चगेट स्थानकातील फलाट क्रमांक ३ वर पॉइंटमधे बिघाड झाल्याने, अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा खोळंबली. लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने धावत होत्या. या घटनेची माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना कळताच, त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दुरूस्तीचे काम हाती घेतले. दुपारी २.२० वाजता तांत्रिक बिघाडाचे निराकरण करून, लोकल सेवा पूर्ववत केली.
© The Indian Express (P) Ltd