गणेशोत्सवानिमित्त मुंबई-ठाण्यातून मोठय़ा संख्येने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वे पाठोपाठ आता पश्चिम रेल्वेनेही जादा गाडय़ा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चाकरमान्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
दरवर्षी गणेशोत्सवासाठी मुंबई-ठाण्यातून मोठय़ा संख्येने चाकरमानी कोकणातील गावाला जातात. यंदा कोकणात जाण्यासाठी रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी प्रवाशांनी लांबलचक राग लावली होती. मात्र आरक्षणाच्या पहिल्याच दिवशी रांगेतील पहिल्या व्यक्तीला प्रतीक्षायादीतील तिकीट हाती पडले. ई-बुकीग रॅकेटमुळे हा प्रकार घडल्याचे त्यानंतर उघडकीस आले. ई-बुकीग रॅकेटची चौकशी करावी आणि कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी जादा गाडय़ा सोडाव्यात अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केली होती. त्यानुसार २७ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत रविवार, बुधवार, गुरुवारी रात्री १२.१५ वाजता वांद्रे टर्मिनस येथून वांद्रे-मडगाव (०९००९) ही गाडी सोडण्यात येणार आहे. अहमदाबाद येथून २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या काळात सोमवार, गुरुवार व रविवारी अहमदाबाद – मडगाव (०९४१६) ही गाडी सोडण्यात येणार आहे. या दोन्ही गाडय़ांचे बुकीग ४ ऑगस्टपासून सुरू होणार असून या गाडय़ा महत्त्वाच्या स्थानकांवर थांबविण्यात येणार आहेत.
नाहूर-भांडूप दरम्यान रुळाला तडा
मध्य रेल्वेवरील नाहूर आणि भांडूप रेल्वे स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावरील रुळाला रात्री ९.५० च्या सुमारास तडा गेला. यामुळे पाच रेल्वे गाडय़ा अप धिम्या मार्गावरुन वळवाव्या लागल्या. दरम्यान, मुलुंड आणि विद्याविहार दरम्यान अप जलद मार्गावरील रेल्वे गाडय़ा अप धिम्या मार्गावरुन सोडण्यात आल्या. या घटनेमुळे मध्य रेल्वेच्या गाडय़ा १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत होत्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा