मुंबई : पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित, सामान्य लोकलमधून विनातिकीट प्रवाशांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे तिकीटधारक प्रवाशांचा प्रवास गैरसोयीचा होत आहे. विनातिकीट प्रवाशांमुळे पश्चिम रेल्वेच्या महसुलावर परिणाम होत आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेने चालू आर्थिक वर्षात जानेवारी २०२५ पर्यंत वातानुकूलित लोकलमधून ५१हजार ६०० विनातिकीट प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून १.७२ कोटी रुपये दंड वसूल केला.
जगातील सर्वाधिक व्यस्त रेल्वे व्यवस्थेच्या यादीत मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गाचा क्रमांक लागतो. उपनगरीय रेल्वे सेवेवरून दररोज लाखोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. पश्चिम रेल्वेवर दररोज १,४०६ लोकल फेऱ्या धावतात. या लोकल फेऱ्यांमधून सुमारे ३० लाख प्रवासी प्रवास करतात. परंतु, हजारो प्रवासी तिकीट न काढता प्रवास करीत असल्याने त्यांची नोंद होत नाही. त्यामुळे तिकीटधारक प्रवाशांना योग्य सुविधा पुरवण्यात काही वेळा अडचणीचे ठरते. पश्चिम रेल्वेवरील सर्व तिकीटधारक प्रवाशांना त्रासमुक्त, आरामदायी प्रवास आणि चांगल्या सेवा देण्यासाठी, विनातिकीट प्रवाशांची धरपकड सुरू आहे.
पश्चिम रेल्वेवर सध्या १०९ वातानुकूलित लोकल फेऱ्या धावतात. यामधून दररोज सुमारे १.२६ लाख प्रवासी प्रवास करतात. २०२४-२५ या आर्थिक वर्षात (जानेवारी २०२५ पर्यंत) मुंबई सेंट्रल विभागाच्या तिकीट तपासणी पथकाने वातानुकूलित लोकलमध्ये विनातिकीट प्रवाशांची ५१ हजार ६०० हून अधिक प्रकरणे सापडली. या प्रकरणातून दंड स्वरूपात १.७२ कोटी रुपये वसूल करण्यात आले.
जानेवारी २०२५ मध्ये विनातिकीट प्रवासाच्या ६,२५८ प्रकरणांमध्ये २०.९७ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. तर, जानेवारी २०२४ मध्ये ४,७४३ प्रकरणांमध्ये १६.०४ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. दंडाच्या रकमेत ३१ टक्के आणि पकडलेल्या प्रकरणांच्या संख्येत ३२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
तिकीटधारक प्रवाशांचा प्रवास सुधारण्यासाठी आणि वातानुकूलित लोकलमध्ये विनातिकीट प्रवाशांचा प्रवास रोखण्यासाठी, पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाने अनेक उपक्रम सुरू केले आहेत. त्यात अनियमित प्रवासाच्या प्रकरणांवर लक्ष ठेवण्यासाठी वातानुकूलित लोकलमध्ये एक पथक तयार करण्यात आले आहे. या पथकामार्फत नियमित तपासणी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच वातानुकूलित लोकल प्रवाशांना तक्रार करण्यासाठी मदतवाहिनी क्रमांक १३९ प्रदान करण्यात आला आहे. तसेच व्हाॅट्स ॲप क्रमांक ९००४४९७३६४ वर तक्रार करता येणे शक्य आहे. त्याची त्वरित दखल घेऊन तक्रारीचे निवारण करता येणार आहे.