गणेशोत्सवात ओसंडून वाहणारा मुंबईकरांचा उत्साह अनंतचतुर्दशीच्या दिवशी शिगेला पोहोचतो. या उत्साहाचा विचार करून पश्चिम रेल्वे आणि ‘बेस्ट’ने मुंबईकरांसाठी विशेष पावले उचलली आहेत. विसर्जन रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याने पश्चिम रेल्वे रात्री आठ विशेष फेऱ्या चालवणार आहे. त्यापैकी चार फेऱ्या चर्चगेटहून विरारकडे चालवल्या जातील, तर चार फेऱ्या विरार ते चर्चगेट मार्गावर चालतील. तर ‘बेस्ट’ने वाहतूक कोंडीचा विचार करून आपल्या ताफ्यातील निम्म्याहून जास्त गाडय़ा आगारातच उभ्या ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
मध्यरात्री विसर्जनाचा सोहळा पाहून आपापल्या घरी परतणाऱ्या प्रवाशांचा विचार करून पश्चिम रेल्वेने या विशेष फेऱ्या चालवल्या आहेत. या फेऱ्या रात्री चर्चगेटवरून १.१५, १.५५, २.२५ आणि ३.२० या वेळी निघतील. या गाडय़ा विरारला २.४७, ३.३०, ४.०० आणि ४.५५ ला पोहोचतील. तर विरारहून या गाडय़ा ००.१५, ००.४५, १.४० आणि २.५५ या वेळी निघून चर्चगेटला १.४५, २.१७, ३.१२ आणि ४.३० वाजता पोहोचतील.
त्याचबरोबर चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या जलद गाडय़ा संध्याकाळी ५.३० ते ८.१५ या दरम्यान मुंबई सेंट्रलच्या पुढे सर्वच स्थानकांवर थांबतील. मात्र चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या गाडय़ा संध्याकाळी ५.१० ते रात्री १०.०० या दरम्यान चर्नीरोड स्थानकावर थांबणार नाहीत.
दरम्यान, विसर्जनादरम्यान रस्त्यांवरील लोंढय़ांचा विचार करून बेस्ट प्रशासनाने आपल्या बहुतांश गाडय़ा आगारातच उभ्या करण्याचा निर्णय घेतला आहे. दुपारी एकनंतर वातानुकुलित सेवा पूर्णपणे बंद राहतील. तसेच दुपारी अडीच वाजल्यानंतर बेस्टच्या ताफ्याताली ४०२० बसेसपैकी १९०४ एवढय़ाच बस चालवल्या जाणार आहेत, असे प्रशासनातर्फे कळवण्यात आले आहे.
पाखटाची भीती कायम
दीड आणि गौरी गणपतींच्या विसर्जनाच्या वेळी गिरगाव चौपाटीवर समुद्रात उतरलेल्या भाविकांना पाखटाने (स्टींग रे) चावा घेतल्यामुळे रुग्णालयात धाव घ्यावी लागली होती. मुख्यत्वे ओहोटीच्या वेळी समुद्रात गेलेल्या भाविकांना पाखटांनी चावा घेतला होता. पाखटांचा मुक्काम अद्याप गिरगाव चौपाटीजवळच आहे.
त्यामुळे अनंतचतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर पाण्यात उतरताना सावधगिरी बाळगावी. पालिकेने उपलब्ध केलेल्या तराफ्यांवरुन गणेशमूर्तीचे विसर्जन करावे, असे आवाहन अॅड. नरेश दहिबावकर यांनी केले आहे.