दोन फेब्रुवारी २०१९ रोजी लोअर परळच्या पूल दुरुस्तीसाठी पश्चिम रेल्वेवर तब्बल ११ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. अंधेरी येथे झालेल्या दुर्घटनेनंतर रेल्वे आणि पालिकेने पुलाचे ऑडिट करायला सुरवात केली. त्यानंतर कारीरोड, घाटकोपर, माटुंगा रोड आणि लोअर परळचा पूल दुरुस्तीसाठी बंद करण्यात आला होता.
लोअर परळ स्थानकाजवळील उड्डाणपुलाचे गर्डर काढण्यासाठी दोन फेब्रुवारीला मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ४० टन वजनी दोन क्रेनच्या मदतीने या दिवशी उड्डाणपुलाला नवे गर्डर टाकण्यात येतील. यासाठी दोन फेब्रुवारीला रात्री १० वाजल्यापासून तीन फेब्रुवारीला सकाळी ९ वाजेपर्यंत पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगाब्लॉकच्या काळात लोअर परळ ते चर्चगेटदरम्यान एकही लोकल धावणार नाही. अंधेरी, विरार, वसई, भाईंदर, बोरिवलीतून सुटणाऱ्या लोकल प्रभादेवी स्थानकापर्यंत चालवण्यात येतील.
शिवाय, या मार्गावरील अनेक मेल, एक्स्प्रेसमधील वेळेत बदल होईल. लोअर परळ स्थानकाजवळील डिलाईल पूल गंजल्याचे स्पष्ट झाल्याने पश्चिम रेल्वेने पूल तोडून दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा पूल बंद होता.