विश्रांतिगृहांमधील अपुऱ्या सुविधा, साप्ताहिक रजांचा अभाव, रिक्त जागांचा अनुशेष आदी कारणांसाठी पश्चिम रेल्वेच्या उपनगरी गाडय़ांच्या मोटरमेननी या आठवडय़ात आंदोलनाचा इशारा दिला आहे. उपनगरी गाडय़ांच्या गार्डस्नीही १५ जूनपासून आपल्या मागण्यांसाठी यापूर्वीच आंदोलनाचा इशारा दिला आहे.
पश्चिम रेल्वेच्या उपनगरी गाडय़ांच्या मोटरमेनसाठी असलेल्या विश्रांतिगृहांमध्ये असलेल्या सुविधा अपुऱ्या असून वारंवार संघटनेच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाकडे त्याबाबत तक्रार करण्यात आली आहे. मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे पश्चिम रेल्वे मोटरमन्स युनियनचे म्हणणे आहे. साप्ताहिक सुटय़ा नाकारणे, मोटरमन्सना सतत कामाच्या तणावाखाली ठेवणे आदीमुळे मोटरमेनमध्ये अंसतोष निर्माण झाला असून व्यवस्थापनाने मागण्यांवर त्वरित विचार केला नाही तर या आठवडय़ाच्या अखेरीस आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.
दरम्यान, पावसाळा आला की प्रवाशांना वेठीस धरण्याचा मोटरमन्स संघटनेचा हा प्रयत्न असल्याचे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे.