मुंबई : पश्चिम रेल्वेने प्रवासी सेवा वाढवण्याबरोबरच उत्पन्न वृद्धीवरही भर दिली आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाने २०२४-२५ या आर्थिक वर्षात आतापर्यंतचा सर्वाधिक व्यावसायिक महसूल मिळवला आहे. मुंबई सेंट्रल विभागाने सुमारे ४,४८५ कोटी रुपये महसूल मिळवला असून वातानुकूलित लोकलमधून मिळालेल्या उत्पन्नाचा त्यात समावेश आहे.

पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाची व्यावसायिक कामगिरी उल्लेखनीय झाली आहे. सामान्य लोकल, वातानुकूलित लोकल आणि लांबपल्लाच्या रेल्वेगाड्यामधून महसूल चांगला मिळाला आहे. त्याचबरोबर मालवाहतूक, पार्किंग आणि कॅटरिंगमधून आतापर्यंतचा सर्वोत्तम महसूल प्राप्त झाला आहे.

मुंबई सेंट्रल विभागाला प्रवासी वाहतूक (उपनगरीय आणि लांबपल्ल्यांच्या रेल्वेगाड्या) महसूल श्रेणीमध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक ३,७८२ कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळला आहे. तर प्रवासी आरक्षण यंत्रणेमधूनही (पीआरएस) आतापर्यंतचा सर्वोत्तम महसूल प्राप्त झाला आहे. तसेच मालवाहतूक श्रेणीत आतापर्यंतचा सर्वाधिक सुमारे २५६ कोटी रुपये महसूल मिळाला आहे. तसेच पश्चिम रेल्वेने सशुल्क वाहनतळाच्या कंत्राटातून १४ कोटी रुपये, कॅटरिंग स्टॉल्समधून १६ कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. या कामगिरीबद्दल पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अशोक कुमार मिश्रा यांनी पश्चिम रेल्वे प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

मुंबई सेंट्रल विभागाने डिजिटल तिकीट, पीआरएस आणि गर्दी व्यवस्थापन धोरणांद्वारे प्रवाशांच्या सुविधांमध्ये वाढ केली आहे. याव्यतिरिक्त पायाभूत सुविधांचा विकास, मालवाहतुकीतील नाविन्यपूर्ण उपक्रम आणि स्थानकांच्या सुधारणांमुळे पश्चिम रेल्वे आघाडीवर आली आहे. विविध क्षेत्रात केलेल्या प्रयत्नांमुळे महसुलात वाढ झाली आहे, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनित अभिषेक यांनी सांगितले.

वातानुकूलित लोकल प्रवाशांच्या पसंतीस

पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकल प्रवाशांच्या पसंतीस उतरली आहे. वातानुकूलित लोकलमुळे पश्चिम रेल्वेच्या तिजोरीत भर पडली आहे. वातानुकूलित लोकलमधून २०२४-२५ मध्ये ४.६५ कोटी प्रवाशांनी प्रवास केला असून त्याद्वारे पश्चिम रेल्वेला २१५ कोटी रुपये उत्पन्न मिळाले. तर, २०२३-२४ मध्ये वातानुकूलित लोकलमधून ३.६४ प्रवाशांनी प्रवास केला होता आणि त्याद्वारे पश्चिम रेल्वेच्या तिजोरीत १६८ कोटी रुपये महसूल जमा झाला होता. मार्च २०२४ मध्ये वातानुकूलित लोकलमधून दररोज सरासरी १,०८,९१० प्रवासी प्रवास करीत होते. तर, मार्च २०२५ मध्ये प्रवाशांची संख्या १,६३,२६५ वर पोहचली. सध्या पश्चिम रेल्वेवर दररोज १,४०६ लोकल फेऱ्या धावतात. यामध्ये १०९ वातानुकूलित लोकलच्या फेऱ्यांचा समावेश आहे.

वातानुकूलित लोकल फेऱ्या वाढणार

वातानुकूलित लोकलला मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे येत्या काळात पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकल फेऱ्यांचा विस्तार करण्याचा विचार सुरू आहे, असे पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.