पश्चिम रेल्वेचे सीसीटीव्ही यंत्रणेला प्राधान्य

आपात्कालीन परिस्थितीत महिला प्रवाशांना लोकलच्या मोटरमन तसेच गार्डशी संपर्क करता यावा, यासाठी उपनगरीय रेल्वेगाडीच्या काही डब्यांत प्रायोगिक तत्त्वावर बसवण्यात आलेली ‘टॉक बॅक’ यंत्रणा सर्वच डब्यांत बसवण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेला पश्चिम रेल्वे प्रशासनाने मुरड घातली आहे. या यंत्रणेचा प्रभावी वापर आणि खर्च यांचा ताळमेळ बसत नसल्याने ही योजना केवळ वातानुकूलित लोकलमध्ये राबवण्याचा प्रशासनाचा निर्णय आहे.

लोकल गाडय़ांतील गुन्ह्यंना आळा घालण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत महिला प्रवाशांना तात्काळ मदत मिळावी यासाठी महिला डब्यात टॉक बॅक यंत्रणा बसविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला होता. त्यानुसार मध्य रेल्वेने प्रायोगिक तत्त्वावर एका लोकलच्या महिला डब्यात ही यंत्रणा बसविली. डब्यातील असलेल्या स्पीकरमार्फत महिला प्रवासी गार्ड किंवा मोटरमनशी संवाद साधून तात्काळ मदत मागू शकते. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव दिलेल्या या यंत्रणेचा दुरुपयोग होत असल्याचे मध्य रेल्वेला आढळून आले. त्यामुळे या मार्गावरील टॉक बॅक यंत्रणा सेवा मागे घेण्यात आली.

दरम्यान एल्फिन्स्टन रोड येथील दुर्घटनेनंतर पश्चिम रेल्वेनेदेखील सर्व लोकलच्या डब्यांत सीसीटीव्हींबरोबरच महिला डब्यात टॉक बॅक यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी १२३ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले. आतापर्यंत तीन लोकल गाडय़ांच्या महिला डब्यात टॉक बॅक यंत्रणा आहे. मात्र त्याचा गैरवापर होण्याची शक्यता, होणारा खर्च, यंत्रणा हाताळण्यासाठी गार्ड, मोटरमनसोबतच रेल्वे सुरक्षा दलावर पडणारा ताण इत्यादींमुळे टॉक बॅक यंत्रणेचा विस्तार केला जाणार नाही, असे पश्चिम रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. येत्या काही वर्षांत वातानुकूलित लोकल गाडय़ा दाखल होणार आहेत. ही यंत्रणा केवळ याच गाडय़ांमध्ये असेल.

सध्या पश्चिम रेल्वेच्या तीन गाडय़ांमधील महिला डब्यात टॉक बॅक यंत्रणा आहे. त्याचा विस्तार केला जाणार नाही. त्याचा वापर होत नाही आणि ते उपयोगीही नाही. त्यामुळे फक्त सीसीटीव्ही कॅमेरेच सामान्य लोकल गाडय़ांच्या सर्व डब्यांत बसविण्यावर भर देण्यात येईल. येत्या काही वर्षांत चैन्नईतील रेल्वेच्या इंटिग्रल कोच कारखान्यातून मुंबईत वातानुकूलित लोकल गाडय़ा दाखल होणार आहेत. त्यात मात्र ही यंत्रणा असेल.

– मुकुल जैन, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पश्चिम रेल्वे

Story img Loader