पश्चिम रेल्वेकडून सल्लागार नियुक्तीसाठी निविदा

मुंबई : पश्चिम रेल्वेवरील धोकादायक असलेल्या लोअर परळ उड्डाणपुलावर हातोडा पडल्यानंतर आता मुंबई शहरातील महत्त्वाच्या पाच उड्डाणपुलांच्याही पुनर्बाधणीच्या कामाला वेग आला आहे. दादर येथील टिळक उड्डाणपूल, प्रभादेवी येथील कॅरोल पुलासह अन्य तीन पूल असून पुनर्बाधणीच्या कामासाठी प्रथम सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे. त्यासाठी पश्चिम रेल्वेने निविदाही काढली आहे.

अंधेरी गोखले उड्डाणपुलावरील पादचारी मार्गिका कोसळल्यानंतर रेल्वेने मुंबई उपनगरीय मार्गावरील पादचारी पूल, उड्डाणपुलांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. पश्चिम व मध्य रेल्वेने सर्वेक्षण करताना मुंबई पालिका व आयआयटीची देखील मदत घेतली. केलेल्या पाहणीत रेल्वे हद्दीतील प्रथम लोअर परळ स्थानकाला लागूनच असलेला उड्डाणपूल अधिक धोकादायक असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या पुलाची पुनर्बाधणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अकरा तासांचा ब्लॉक घेऊन पुलाचे पाडकामही केले. या पुलाच्या बांधणीसाठीही निविदा काढण्यात आली आहे.

ही प्रक्रिया सुरू असतानाच पश्चिम रेल्वेने शहरातील महत्त्वाच्या असलेल्या आणखी पाच उड्डाणपुलांच्या पुनर्बाधणीसाठी प्रक्रिया सुरू केली आहे. ग्रॅण्ट रोड येथील फेरेरे, मुंबई सेन्ट्रलमधील बेलासिस, दादर येथील टिळक पूल, प्रभादेवी येथील कॅरोल पूल आणि महालक्ष्मीमधील उड्डाणपुलाचा समावेश आहे. पुलाची बांधणी कशी करावी, त्याआधी पाडकाम कसे होईल, त्यासाठी नियोजन कसे करावे, इत्यादींसाठी सल्लागार नेमला जाणार आहे. सल्लागारांच्या नियुक्तीसाठी निविदाही काढली आहे. या संदर्भात पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सल्लागारांची नियुक्ती केली जाणार असल्याचे सांगितले. पुलांची बांधणी ही टप्प्याटप्प्यात केली जाईल.

सध्या लोअर परळ उड्डाणपुलाचे पाडकाम पूर्ण झाले असून वर्षभराच्या आतच त्याचीही उभारणी केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. हा पूल बनवण्यासाठी ८४ कोटी रुपये खर्च असून वर्षभरात तो बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

हे काम होतानाच पाच उड्डाणपुलांपैकी नेमक्या कोणत्या पुलाचे काम आधी करणे गरजेचे आहे यावरही विचारविनिमय केला जाणार आहे.

लोअर परळ पुलाचे काम होत असतानाच दुसऱ्या उड्डाणपुलाचे काम हाती घेणे योग्य राहील का, आणि त्यानुसार वाहतूक नियोजन कसे करावे, हेदेखील सल्लागार, वाहतूक पोलिसांशी चर्चा करून निर्णय घेतले जातील.

गोंधळ टाळणार कसा?

लोअर परळ उड्डाणपूल रहदारीसाठी बंद करणार असल्याच्या घोषणेनंतर नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. त्यानंतर पश्चिम रेल्वेने अखेर हा पूल बंद करण्याचा निर्णय घेतला आणि प्रवाशांमधून मोठा  विरोधही झाला. यानंतर प्रवाशांसाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था करताना पश्चिम रेल्वेच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या नाकीनऊ आले. त्यामुळे शहरातील महत्त्वाच्या असलेल्या पाच उड्डाणपुलांची टप्प्याटप्प्यात पुनर्बाधणी करतानाही हाच गोंधळ होऊ शकतो. तर मध्य रेल्वेवरील भायखळा येथीलही उड्डाणपुलांचीही पुनर्बाधणी केली जाणार आहे. सध्या या पुलावरून अवजड वाहनांना बंदी आहे.

Story img Loader