मुंबई : विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मुसक्या आवळण्यासाठी पश्चिम रेल्वेने मोहीम हाती घेतली असून त्याचाच भाग म्हणून रेल्वेच्या वरिष्ठ व्यावसायिक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली एप्रिल – सप्टेंबर २०२४ या कालावधीत विनातिकीट प्रवाशांची धरपकड करून ६८ कोटी रुपय दंड वसूल करण्यात आला. मुंबई धावणाऱ्या लोकलमधील विनातिकिट प्रवाशांकडून २२.७० कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. पश्चिम रेल्वेवरील विनातिकीट प्रवाशांना पकडण्यासाठी वारंवार तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.
मेट्रो ३ : आरे-बीकेसी टप्पा, लोकार्पणाला आठवडा होत नाही तोच सांताक्रुझ मेट्रो स्थानकात गळती
लोकल, रेल्वेगाड्या, पॅसेंजर ट्रेन, उत्सव विशेष रेल्वेगाड्यामधून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना रोखण्यासाठी तिकीट तपासणी पथके सज्ज करण्यात आली आहेत. या पथकांनी गेल्या सहा महिन्यांत ६८ कोटी रुपये दंड वसूल केला. सप्टेंबर २०२४ मध्ये आरक्षित न केलेल्या सामानासह १.३४ लाख विनातिकीट प्रवाशांना शोध घेऊन त्यांच्याकडून ६.१४ कोटी रुपये वसूल करण्यात आले. याशिवाय ऑगस्टमध्ये पश्चिम रेल्वेच्या लोकल, फलाटावर ८० हजार विनातिकीट प्रवाशांची धरपकड करून २.६९ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. गेल्या सहा महिन्यांत धावत्या वातानुकूलित लोकलमध्ये तिकीट तपासणी करून २८ हजार ५०० विनातिकीट आणि सामान्य लोकलचे तिकीट असेलल्या प्रवाशांना पकडून सुमारे ९४ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. दरम्यान प्रवाशांनी योग्य आणि वैध तिकीट घेऊन प्रवास करावा, असे आवाहन पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.