मुंबई : पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी प्रवास मिळावा यासाठी लोकल, मेल / एक्स्प्रेस, तसेच पॅसेजर रेल्वे आणि सुट्टीकालीन विशेष ट्रेनमधील विनातिकीट / अनियमित प्रवाशांना आळा घालण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. एप्रिल, मे २०२४ मध्ये पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ व्यावसायिक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तिकीट तपासणी पथकाने अनेक तिकीट तपासणी मोहीम राबविल्या.
हेही वाचा >>> पवई दगडफेक प्रकरणी दोन गुन्हे दाखल; ५० हून अधिक व्यक्तींना अटक
याद्वारे पश्चिम रेल्वेवरील विनातिकीट प्रवाशांना पकडून एप्रिल, मे या दोन महिन्यात ३८ कोटी रुपये दंड वसूल केला. मे २०२४ मध्ये आरक्षित न केलेल्या सामानासह २.८० लाख विनातिकीट / अनियमित प्रवाशांना पकडून १७.१९ कोटी रुपये वसूल करण्यात आले. याशिवाय मे महिन्यात पश्चिम रेल्वेने मुंबई उपनगरीय विभागात एक लाख प्रकरणे शोधून ४.७१ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. वातानुकूलित लोकलमध्ये विनातिकीट प्रवाशांना पकडण्यासाठी भरारी पथकाद्वारे तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमांद्वारे एप्रिल – मे या कालावधीत ८,५०० विनातिकीट प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच, त्यांच्याकडून २९ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला.