मुंबई : तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ खाऊन रेल्वे परिसर अस्वच्छ करणाऱ्या प्रवाशांविरोधात पश्चिम रेल्वेने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. चालू आर्थिक वर्षात जानेवारी २०२५ पर्यंत सुमारे २,३८३ प्रकरणातून सहा लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
पश्चिम रेल्वेचा परिसर स्वच्छ राहावा यासाठी प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. वारंवार स्वच्छता मोहीम राबवणे, स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून वेळोवेळी साफसफाई करून घेणे अशा उपाययोजना करण्यात येत आहेत. परंतु, काही प्रवासी रेल्वे स्थानक परिसरात थुंकतात अथवा कचरा टाकून अस्वच्छता करतात. अशा प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. तसेच पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाचे नवनिर्वाचित विभागीय रेल्वे व्यवस्थापक पंकज कुमार सिंग यांनी रेल्वेच्या स्वच्छतेवर भर देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच कठोर कारवाईसाठी स्वतंत्रपणे ‘क्लीन अप मार्शल’ योजनेसारखा पर्यायही स्वीकारण्याचा, तसेच दंडाच्या रकमेत वाढ करण्याचा विचार सुरू आहे.
स्थानक आणि फलाटावर पान आणि गुटखा खाऊन थुंकणाऱ्यांवर रेल्वे अधिनियमाच्या कलम १९८ अंतर्गत २०० ते ५०० रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येत आहे. पश्चिम रेल्वेने ‘ऑपरेशन पवित्रा’ उपक्रम हाती घेतला असून रेल्वेच्या वाणिज्य विभागाकडून वारंवार स्वच्छतेचा आढावा घेण्यात येत आहे. स्थानक परिसर, शौचालये स्वच्छ राहावी याबाबत सूचना दिल्या देण्यात येत आहेत. तसेच, स्वच्छतेसाठी कंत्राट पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या कंपनीचे काम योग्य न दिसल्यास किंवा अस्वच्छतेबाबत वारंवार तक्रारी आल्यास, संबंधित कंत्राटदाराचे काम बंद करण्यात येत आहे. पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल विभागातील चर्चगेट ते विरारदरम्यान साफसफाईसाठी कंत्राट पद्धतीने आठ कंपन्यांची नियुक्ती केली. तसेच कामात कुचराई करणाऱ्या कंपन्यांना आतापर्यंत १७.८४ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.
दंड वसुली
एप्रिल २०२४ – २३७ प्रकरणातून ४४,४०० रुपये दंड वसूल
मे २०२४ – २२९ प्रकरणातून ४४,५०० रुपये दंड वसूल
जून २०२४ – ३९१ प्रकरणातून ७५,४७० रुपये दंड वसूल
जुलै २०२४ – ४१० प्रकरणातून ७६,४०० रुपये दंड वसूल
ऑगस्ट २०२४ – ४१४ प्रकरणातून ७२,४०० रुपये दंड वसूल
सप्टेंबर २०२४ – ५०९ प्रकरणातून ९०,४५० रुपये दंड वसूल
ऑक्टोबर २०२४ – ३२४ प्रकरणातून ५५,८५० रुपये दंड वसूल
नोव्हेंबर २०२४ – २१५ प्रकरणातून ३९,८०० रुपये दंड वसूल
डिसेंबर २०२४ – २७३ प्रकरणातून ४७,८०० रुपये दंड वसूल
जानेवारी २०२५ – २८१ प्रकरणातून ५३,७०० रुपये दंड वसूल