मुंबई : पश्चिम रेल्वेवरील कांदिवली येथे मंगळवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास सिग्नलमध्ये बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाली. या बिघाडामुळे अप आणि डाऊन जलद आणि डाऊन धीम्या मार्गावर परिणाम झाला. त्यामुळे अनेक लोकल उशिराने धावल्या. तर, काही लोकल वळवण्यात आल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच, सायंकाळी ७.३० पर्यंत सिग्नलमधील बिघाड पूर्ववत केला. मात्र, वेगमर्यादेमुळे आणि एका मागे एक लोकल खोळंबल्याने प्रवाशांना इच्छितस्थळी पोहोचण्यास विलंब झाला. बिघाडामुळे अनेक जलद लोकल अंधेरी आणि कांदिवली दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गावर वळवण्यात आल्या. मात्र, सायंकाळी गर्दीच्यावेळी बिघाडाची घटना घडल्याने कार्यालयातून घरी जाणाऱ्या नोकरदारांचे प्रचंड हाल झाले. अनेक लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. लोकल कूर्मगतीने पुढे सरकत असल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Western railway service disrupted mumbaiu print news amy