मुंबई : पश्चिम उपनगरीय रेल्वे प्रवाशांसाठी आणखी एक वातानुकूलित लोकल येत्या एका महिन्यात मुंबईत दाखल होणार आहे. या लोकलची बांधणी सध्या चेन्नईतील रेल्वेच्या इंटीग्रल कोच (डबा)कारखान्यात होत आहे. ताफ्यात येणारी ही आठवी लोकल असेल, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिली.
मध्य रेल्वेवर नुकतीच सहावी वातानुकूलित लोकल चेन्नईतील रेल्वेच्या कारखान्यातून दाखल झाली आहे. पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात सध्या सात वातानुकूलित गाड्या आहेत. सातपैकी चार लोकल प्रवाशांच्या सेवेत असून दोन गाड्या देखभाल दुरुस्तीसाठी कारशेडमध्ये आहेत. आता आणखी एका वातानुकूलित लोकलची तांत्रिक चाचणी गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. या महिनाअखेरीस आठवी वातानुकूलित लोकल मुंबईत दाखल होईल, अशी माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी दिली.
वातानुकूलित लोकल ताफ्यात आल्यानंतर त्याच्या काही चाचण्या होतील. त्यानंतरच सामान्य लोकलच्या फेऱ्या रद्द करुन नवीन वातानुकूलित लोकलच चालविणे योग्य की नवीन फेऱ्यांचा समावेश करावा का याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
दरम्यान, पश्चिम रेल्वेवर वातानुकूलित लोकलच्या दररोज ४० फेऱ्या होतात. अल्प प्रतिसादामुळे ५ मे पासून वातानुकूलित लोकलच्या तिकीट दरात कपात केल्यावर पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकलला काहीसा प्रतिसाद वाढू लागला आहे. एप्रिल २०२२ मध्ये ५६ हजार २१ तिकिटे आणि ११,९५४ पास, मे मध्ये १ लाख ९६ हजार ९३८ तिकीटे आणि १६,३८९ पास, जूनमध्ये २ लाख ३८ हजार २७४ तिकीटे तसेच १९ हजार ४७१ पास, तर जुलैमध्ये १ लाख ५२ हजार ५४८ तिकीटे आणि १६ हजार १५९ पासची खरेदी प्रवाशांनी केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून मिळणाऱ्या प्रतिसादामुळे पावसाळा संपताच पश्चिम रेल्वेकडून नव्याने दाखल होणाऱी वातानुकूलित लोकल चालवण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.