मुंबई : पश्चिम रेल्वेवरील दादर-भुसावळ विशेष रेल्वेगाडीला पालघर रेल्वे स्थानकावर अतिरिक्त थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे पालघरमधील प्रवाशांना प्रवास करणे सोयीस्कर होणार आहे.

गाडी क्रमांक ०९०५१/०९०५२ दादर-भुसावळ विशेष रेल्वेगाडीला पालघर येथे थांबा देण्यात आला आहे. गाडी क्रमांक ०९०५१ दादर-भुसावळ विशेष रेल्वेगाडी १५ मार्चपासून रात्री १२.०५ वाजता दादरहून सुटेल. ही गाडी पालघर स्थानकावर रात्री १.२९ वाजता थांबेल आणि तिथून रात्री १.३१ वाजता सुटेल. तर, गाडी क्रमांक ०९०५२ भुसावळ-दादर विशेष रेल्वेगाडी १५ मार्चपासून सायंकाळी ५.४० वाजता भुसावळवरून सुटेल. ही रेल्वेगाडी पालघर स्थानकावर रात्री ३.१७ वाजता पोहोचेल आणि रात्री ३.१९ वाजता सुटेल. या रेल्वेगाडीला पालघरसह बोरिवली, विरार, बोईसर, डहाणू रोड, वापी, वलसाड, नवसारी, भेस्तान, बारडोली, व्यारा, नंदुरबार आणि जळगाव येथे थांबा असेल, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

मुंबई-रीवा दरम्यान विशेष रेल्वेगाड्यांच्या ४ फेऱ्या

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते रीवा दरम्यान विशेष रेल्वेगाड्यांच्या ४ फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गाडी क्रमांक ०२१८८ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २१ मार्च आणि २८ मार्च रोजी दुपारी १.३० वाजता सुटेल आणि रीवा येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ९.४५ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०२१८७ विशेष रेल्वेगाडी रीवा येथून २० मार्च आणि २७ मार्च रोजी दुपारी १.५० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १२.२० वाजता पोहोचेल.

हडपसर-हिसारदरम्यान होळी विशेष रेल्वेगाड्यांच्या ४ अतिरिक्त फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक ०४७२६ हडपसर-हिसार विशेष रेल्वेगाडी १७ मार्चपर्यंत चालवण्यात येणार होती. परंतु, ही रेल्वेगाडी आता २४ मार्च आणि ३१ मार्च रोजीही धावेल. गाडी क्रमांक ०४७२५ हिसार – हडपसर विशेष रेल्वेगाडी १६ मार्चपर्यंत चालवण्यात येत होती. मात्र, आता ही रेल्वेगाडी २३ मार्च आणि ३० मार्च रोजी चालवण्यात येईल. या विशेष रेल्वेगाड्यांचे आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर १६ मार्चपासून विशेष शुल्कासह सुरू होईल, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.