लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : होळी आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यांची संधी साधून अनेक जण बाहेरगावी गेले आहेत. बाहेरगावी गेलेल्यांचा रविवारी परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने रविवारी कोणताही ब्लॉक न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. परंतु, मध्य रेल्वेवर रविवारी दिवसकालीन ब्लॉक असल्याने, प्रवाशांना प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
पश्चिम रेल्वेवर रविवारी ब्लॉक न घेतल्याने प्रवाशांना त्यांचा नियोजित प्रवास वेळेत पूर्ण करणे शक्य होईल. तसेच, प्रवाशांची गर्दी विभाजित करणे शक्य होणार आहे. तर, मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवारी उपनगरीय विभागांवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी मेगाब्लॉक आवश्यक असून प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मध्य रेल्वे मुख्य मार्ग
कुठे : ठाणे – कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर
कधी : सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० पर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीमध्ये सीएसएमटी येथून सकाळी ९.३४ ते दुपारी ३.०३ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद/अर्धजलद लोकल ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल त्यांच्या निश्चित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील. कल्याण येथून सकाळी १०.२८ पासून दुपारी ३.४० पर्यंत सुटणाऱ्या अप जलद/अर्धजलद लोकल कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल त्यांच्या निश्चित थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर थांबतील आणि पुढे मुलुंड स्थानकावर अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. अप आणि डाऊन मार्गावरील लोकल त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा काही मिनिटे उशिरा नियोजित स्थानकात पोहचतील.
हार्बर मार्ग
कुठे : पनवेल-वाशी अप आणि डाऊन मार्गावर
कधी : सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – पनवेल / बेलापूर अप आणि डाऊन लोकल रद्द करण्यात येणार आहेत. पनवेल – ठाणे अप आणि डाऊन लोकल सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. ब्लॉक काळात सीएसएमटी -ते वाशीदरम्यान विशेष लोकल चालवण्यात येतील. तर, ठाणे – वाशी / नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स – हार्बर मार्गावर लोकल सेवा उपलब्ध असेल. बेलापूर / नेरुळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट मार्गिका उपलब्ध असेल.