राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय झाल्यानंतर अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले आहे. मुंबईतही १० ऑगस्टपर्यंत सतर्कतेचा इशारा दिला आहे. या कालावधीत मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि पालघरच्या काही भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हेही वाचा – मंत्रीमंडळ विस्तारावरून अजित पवारांचा खोचक टोला; म्हणाले “अधिवेशन… ”
पुढच्या तीन ते चार तासांत मुंबई, ठाणे आणि पालघरच्या जिल्ह्यातील काही ठिकाणी ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाच्या मुंबई कार्यालयाकडून देण्यात आली आहे. तसेच समुद्र किनाऱ्यावरही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, येत्या पाच दिवसांत कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्येही जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच नदी काठच्या गावांना सावध राहण्याचा इशाराही हवामान विभागाच्यावतीने देण्यात आला आहे.