मुंबई व कोकण किनारपट्टीवर व्हेल व डॉल्फिन हे महाकाय मासे मृत वा जिवंत  वाहून येण्याच्या संख्येत अलीकडच्या काळात वाढ झाल्याचे आढळून येत आहे. मात्र, ते  वाहून का येत आहेत, हा प्रश्न सरकारी यंत्रणा, सागरी अभ्यासक, पर्यावरणवादींसाठी अनुत्तारित असल्याने त्यातच वाहून येण्याची त्यांची  संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने या सर्वांनीच चिंता व्यक्त केली आहे. मात्र त्यांना आलेल्या अवस्थेत पुन्हा समुद्रात ढकलण्यात येत असल्याचा प्रकार होत असल्याने त्यास पर्यावरणप्रेमींकडून तीव्र विरोध होत आहे.

महाराष्ट्र राज्याला ७५० किलोमीटरची विस्तीर्ण सागरी किनारपट्टी लाभली आहे. सागरी जैवविविधतेचे अनोखे दर्शन या भागात पाहण्यास मिळते. पण सध्या जलप्रदूषण, भराव टाकणे, खारफुटींची कत्तल आदी कामे या भागात होत असल्याने सागरी परिसंस्थेचा समतोल बिघडत चालला आहे.  गेल्या काही वर्षांत व्हेल, डॉल्फिन आदी सस्तन प्राण्यांवर होत असून ते  मासे मृतावस्थेत किनाऱ्यावर येत आहेत. हा त्याचाच परिणाम असल्याचे सांगितले जाते.  गेल्या ४ वर्षांत नऊ महाकाय देवमासे राज्याच्या किनारपट्टीवर वाहून आले असून त्यातील सात ब्रूडीज व्हेल, एक स्पर्म व्हेल, एक ब्लू व्हेल असून यातील दोन व्हेल माशांना वाचवून सागरात सोडण्यात आले आहे. मात्र या माशांना सागरात सोडण्याला पर्यावरणवादी आता आक्षेप घेताना दिसत आहेत.

वाहून येण्यामागची संभाव्य कारणे

व्हेल माशांचे दिशादर्शन हे सोनार यंत्रणेप्रमाणे सुरू असते. यात  काही बिघाड झाल्यास ते भरकटल्याने किनाऱ्यावर येण्याची               शक्यता असते.

गंभीर आजार झाल्याने किनाऱ्यावर वाहून येऊ शकतात.

या माशांची लहान पिल्ले उपासमारीपोटी किनाऱ्यावर वाहून  आल्याच्या घटनांची नोंद आहे.

मोठय़ा जहाजांचे पंखे लागून जखमी झालेले मासेदेखील अशा  पद्घतीने किनाऱ्यावर येऊ शकतात.

सागरी परिसंस्थेत मानवी हस्तक्षेप मोठय़ा प्रमाणात झाल्याने या माशांवर परिणाम झाल्याची शक्यता अधिक आहे.

प्रमुख घटना

२०१२ – ब्रूडी व्हेल – रायगड</p>

२०१२ – स्पर्म व्हेल – सिंधुदुर्ग

२०१५ – ब्लू व्हेल – रेवदंडा

२०१६ – ब्लू व्हेल – रत्नागिरी</p>

२०१६ – ब्रूडी व्हेल –

२०१६ – ब्रूडी व्हेल – गुहागर

मुंबई व राज्याच्या किनारपट्टीवर वाहून येणारे महाकाय देवमासे  याच्या कारणांचा आम्ही शोध घेत आहोत. त्यासाठी कामही सुरू केले आहे. मात्र एखादा व्हेल मासा उथळ पाण्यात येऊन तडफडत असेल तर आम्ही त्याला समुद्रात पुन्हा जिवंत अवस्थेत सोडण्यासाठी निश्चित प्रयत्न करू. ही आमची ठाम भूमिका आहे.

– एन. वासुदेवन,कांदळवने विभागाचे प्रमुख

व्हेल व डॉल्फिन हे सस्तन प्राणी किनाऱ्यावर वाहून का येतात, त्याची कारणे काय आहेत,  त्यासाठी  या क्षेत्रातले पशू वैद्य, संशोधक, सरकारी यंत्रणा आणि या माशांच्या अभ्यासासाठी लागणारी आधुनिक उपकरणे आणि यंत्रे सध्या उपलब्ध करावी लागणार आहे. त्यानंतर काही वर्षांनी याबाबत एक ठोस अभ्यासापर्यंत पोहोचता येईल.

– मिहीर सुळे,व्हेल व डॉल्फिन माशांचे अभ्यासक

एका व्हेल माशाचे वजन हे काही टनात असते. तो जेव्हा किनाऱ्यावर वाहून येतो तेव्हा त्याचे वजन त्याला पेलता येत नाही. हे वजन पाण्यात पोहताना माशाला जाणवत नाही मात्र जमिनीवर जाणवते. त्यामुळे जमिनीवर आपल्याच वजनाखाली या माशांच्या शरीरातील सगळे अवयव दबले जाऊन अक्षरक्ष: फुटतात. त्यामुळे अशा वेळी काहीसा जिवंत असलेला हा महाकाय मासा पाण्यात सोडला तर तो दुसऱ्या किनाऱ्यावर जाऊन मरणारच. दुर्दैवाने ही बाब सरकारी यंत्रणांच्या लक्षात येत नाही.  .

– आनंद पेंढारकर,  संचालक, स्प्राऊट संघटना

Story img Loader