अजमल कसाबला फाशी दिल्यानंतर त्याच्यासाठी कोटय़वधी रुपये खर्च करून बांधलेल्या आर्थर रोड कारागृहातील ‘अंडासेल’चे आता काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अटकेनंतर काही दिवस त्याला गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष लॉक-अपमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्याची आर्थर रोड कारागृहात रवानगी करण्यात आली.
त्याला खटल्यासाठी कनिष्ठ न्यायालयापर्यंत नेणे जिकिकीचे आणि सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याने आर्थर रोड तुरुंगातच विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती. त्यामुळे ‘अंडासेल’मधून न्यायालयापर्यंत जाणारा मार्गही स्फोटकरोधक करण्यात आला होता. यासाठी कोटय़वधींचा खर्च करण्यात आला व कसाबला फाशी देण्यासाठी येरवडा तुरुंगात नेईपर्यंत केला जात होता.
वास्तविक आर्थर रोड तुरुंगात कच्च्या कैद्यांना ठेवले जाते. एकदा का कनिष्ठ न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली की त्याला अन्य कारागृहांमध्ये हलविण्यात येते. परंतु फाशीची शिक्षा सुनावल्यानंतरही कसाबला आर्थर रोडमध्येच ठेवण्यात आले. त्याचप्रमाणे एखाद्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली आणि त्याने कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात अपील केले, तर कायद्यानुसार अपिलाच्या सुनावणीदरम्यान त्याला न्यायालयासमोर हजर करणे अनिवार्य असते. या कायदेशीर बाबीमुळेही कसाबला इतरत्र हलविण्यात आले नाही. आता त्याला फाशी देण्यात आलेली आहे. परंतु कसाबला फासावर चढविण्यात आल्यावर आता आर्थर रोड कारागृहातील ‘अंडासेल’चे काय? तेथे कोणाला ठेवणार किंवा तो असाच पडून राहणार का? हे प्रश्न आता निर्माण झाले आहेत!    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा