अतिरिक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पश्चिम उपनगरातील विशिष्ट परिसर फेरीवालामुक्त करून नागरिकांना दिलासा दिलेला असतानाच दक्षिण, मध्य, पूर्व तसेच उत्तर उपनगरातील फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाचे काय होणार, असा सवाल केला जात आहे. एक अतिरिक्त आयुक्त ठरवून फेरीवाल्यांविरोधात कारवाई करीत असेल तर इतर चार विभागाचे अतिरिक्त आयुक्त रस का घेत नाही, असेही बोलले जात आहे.
रेल्वे स्थानक परिसर वा काही महत्त्वाच्या जंक्शनवर फेरीवाल्यांमुळेच वाहतुकीची कोंडी होते, हे गुपित राहिलेले नाही. पदपथ व्यापणारे फेरीवाले रस्त्यावरही पथारी पसरू लागल्याचे चित्र बहुतांश सर्वत्र दिसते. असे असुनही पालिका मात्र कारवाई करताना दिसत नाही. पोलिसांकडून कारवाई करण्यासाठी संरक्षण दिले जात नाही, अशी ओरड केली जाते. फेरीवाल्यांकडून मात्र या दोन्ही यंत्रणांना हप्ते दिल्यानंतर कारवाई होत नाही, असे ठामपणे सांगितले जाते. वांद्रे परिसरातील हिल रोडवर आतापर्यंत कधीच कारवाई होऊ शकली नव्हती. परंतु नांगरे-पाटील यांनी पाठपुरावा करून हा मार्ग रिकामा करून दाखविला. त्याचवेळी इतर परिसराचीही यादी करून कारवाई सुरू केली. त्याचवेळी इतर परिसरातील अतिरिक्त आयुक्त मात्र थंड असल्याचे दिसून येते.
पालिकेकडून कारवाईसाठी पत्र आले की, तात्पुरता बंदोबस्त देण्यापुरतेच पोलीस मर्यादित राहिल्याचे दिसून येते. शहरातील सीएसटी, क्राफर्ड मार्केट, मनीष मार्केट, काळबादेवी, गिरगाव, ग्रँट रोड, लालबाग, परळ, दादर, चेंबूर, गोवंडी, शिवाजी नगर, कुर्ला, मुलुंड, विक्रोळी, घाटकोपर, सायन आदी परिसरात फेरीवाल्यांमुळेच वाहतुकीची कमालीची कोंडी होत असतानाही पालिका वा पोलिसांकडून कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. नांगरे-पाटील यांचा कित्ता या अतिरिक्त आयुक्तांनीही गिरवावा, अशी मागणी लोकांकडून केली जात आहे.

Story img Loader