आझाद मैदानात मागील ११ ऑगस्ट रोजी झालेल्या हिंसाचाराबाबत महिला वाहतूक पोलीस निरीक्षकाने केलेल्या कवितेविरोधातील तक्रारीबाबत काय कारवाई केली, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी सरकारला केली.
ही कविता जातीय तेढ निर्माण करणारी असून सुजाता पाटील या महिला पोलीस निरीक्षकाने ती लिहिली आहे. त्याद्वारे सामाजिक बांधीलकी धोक्यात आणली जात आहे, असा आरोप करीत अमीन मुस्तफा इद्रीसी आणि हिंचारातील जामिनावर सुटलेल्या दोन आरोपींनी न्यायालयात धाव घेतली आहे. पाटील यांच्यासह पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह, सहआयुक्त (प्रशासन) हेमंत नागराळे आणि ही कविता प्रसिद्ध करणाऱ्या नियतकालिकाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती अशोक भंगाळे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी झाली. पाटील यांनी या कवितेबाबत माफी मागितली असल्याची माहिती सरकारी वकील रेवती ढेरे यांनी न्यायालयाला दिली. मात्र याचिकादाराने या प्रकरणी केलेल्या तक्रारीवर काय कारवाई केली याबाबत उत्तर दाखल करण्याचे आदेश देत न्यायालयाने याचिकेवरील सुनावणी १८ फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली.

Story img Loader