आमदारांच्या संख्याबळाच्या जोरावर पक्षाच्या नेतृत्वावर गेली काही वर्षे उपमुख्यमंत्री अजित पवार हे ‘दादा’गिरी करीत असल्यानेच बहुधा पक्षात आमदारांना विचारून नव्हे तर उच्च पातळीवर निर्णय घेतले जातात, असा स्पष्ट संदेश राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पुतण्याला दिला आहे. या गोंधळात काका-पुतण्यात नक्की काय चालले आहे, याबाबत पक्षातच संभ्रमाचे वातावरण आहे.
विधानसभेच्या २००४च्या निवडणुकापासून राष्ट्रवादीच्या निर्णय प्रक्रियेत आपल्याला महत्त्व मिळाले पाहिजे यावर अजित पवार यांचा कटाक्ष राहिला. राष्ट्रवादीचे ६२ पैकी ४५ पेक्षा जास्त आमदार अजितदादांना एकनिष्ठ आहेत. विधिमंडळ नेतेपदाकरिता अजितदादांनी आमदारांच्या संख्याबळाच्या आधारेच पक्षनेतृत्वावर दबाव आणला होता. या पाश्र्वभूमीवर पक्षात आमदारांशी चर्चा करून निर्णय होत नसतात, असे शरद पवार यांना सुनवावे लागले आहे. पवार काका-पुतण्यातील संबंधांबाबत राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. दोन्ही बाजूने उघडपणे काही समोर येऊ दिले जात नसले तरी पडद्याआडून सारे काही आलबेल नाही, असे राष्ट्रवादीचे मंत्री किंवा आमदारांकडून खासगीत सांगण्यात येते. पवार काका-पुतण्यामध्ये खरेच अंतर वाढले आहे की, वरवरचा देखावा आहे याबाबत पक्षाच्या नेत्यांना काहीच अंदाज येत नाही. सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व पुढे करून अजितदादांचे पद्धतशीरपणे खच्चीकरण केले जाते, असे अजितदादांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे असते.

Story img Loader