दरवर्षीप्रमाणे यंदाही परंपरेनुसार गणेशोत्सवादरम्यानच्या कोकणात जाणाऱ्या गाडय़ांचे आरक्षण सुरू झाल्यानंतरच काही मिनिटांतच फुल्ल झाल्यानंतर शंकाकुशंकांना उधाण आले आहे. यंदा तर हे आरक्षण फुल्ल होऊन प्रतीक्षा यादी ३००च्या वर जाण्यासाठी दोन मिनिटांचाच कालावधी लागल्याने तर प्रवाशांमध्ये संताप आहे. आसाम-बंगाल या राज्यांतून झालेल्या या आरक्षणामागे आयआरसीटीसीच्या एखाद्या अधिकाऱ्याचा किंवा कर्मचाऱ्याचा हात असल्याची शक्यता रेल्वेतील एका बडय़ा अधिकाऱ्याने वर्तवली आहे. तर या सर्व गौडबंगालात कोकणातील प्रवासीही नाईलाजाने सामील आहेत.
ऑनलाइन आरक्षणे आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून होतात. या संकेतस्थळाला फायरवॉलचेही संरक्षण आहे. हे संरक्षण भेदून आरक्षणात घोळ करणे बाहेरच्या लोकांना शक्य नाही. त्यामुळे या सर्व घोटाळ्यात आयआरसीटीसीच्या तंत्रज्ञान विभागातील एखादा अधिकारी किंवा कर्मचारी सामील आहे का, अशी शंका रेल्वेच्याच एका बडय़ा अधिकाऱ्याने उपस्थित केली आहे. मात्र यासाठी अधिक खोलात जाऊन चौकशी करण्याची गरज असल्याचेही त्याने सांगितले. याबाबत आयआरसीटीसीचे जनसंपर्क अधिकारी प्रदीप कुंडू यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
गणपतीसाठी गावी जाताना प्रवास थोडा तरी सुखकर व्हावा, ही कोकणातल्या प्रत्येक चाकरमान्याची इच्छा असते. त्यासाठी रात्रभर रांगेत उभे राहून तिकीट काढण्यापासून पॅसेंजर गाडीत जागा अडवण्यासाठी धक्काबुक्की करण्यापर्यंत त्याची तयारी असते. नेमकी हीच बाब दलाल हेरत आहेत. शंभर टक्के आरक्षित तिकीट मिळवून देतो, मात्र दुप्पट दर लागेल, असे सांगत दलाल प्रवाशांना हेरतात. खासगी गाडय़ांच्या दरांपेक्षाही खूपच कमी दरांत ही तिकिटे मिळणार असल्याने कोणताही पर्याय नसलेला चाकरमानी याला बळी पडतो. त्यामुळेच ही दलाली वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. या प्रवाशांना मुबलक गाडय़ा आणि पारदर्शक आरक्षण प्रणाली यांची सोय मिळाली, तर असे गैरप्रकार टाळता येणार आहेत.

Story img Loader