शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेचे भवितव्य काय, असा प्रश्न सर्वत्रच चर्चिला जात आहे. विशेषत: शिवसैनिकांना हाच प्रश्न भेडसावत आहे. उद्धव ठाकरे हे किती प्रभावीपणे नेतृत्व करू शकतील की राज ठाकरे यांच्याकडे शिवसैनिकांचा ओघ वाढेल, याबद्दल सर्वाच्याच मनात शंका आहेत. एकूणच शिवसेनेच्या भवितव्याबद्दल वेगवेगळे मतप्रवाह ऐकू येतात.
शिवसेनाप्रमुखांच्या हयातीतच मनसेने बाळसे धरले होते. शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर मात्र मनसे किंवा राज ठाकरे हे फायदा घेण्याची संधी सोडणार नाहीत. उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आतापर्यंत शिवसेनाप्रमुख ठामपणे होते, आता हे छत्र गेले आहे. शिवसेनाप्रमुखांच्या निधानानंतर तरी उद्धव आणि राज या दोन बंधूनी एकत्र यावे, अशी सामान्य शिवसैनिकांची भूमिका आहे. मात्र शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर राज ठाकरे हे अधिक आक्रमक होतील, अशी चिन्हे आहेत. शिवसेनाप्रमुखांच्या अंत्ययात्रेच्या वेळी जाणिवपूर्वक राज ठाकरे यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला. यावरून भविष्यात दोन बंधूंमध्ये कसे संबंध असतील हेच स्पष्ट होते.
बाळासाहेबांनंतरची शिवसेना याबाबत विविध राजकीय नेत्यांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत. बाळासाहेब हे शिवसैनिकांचे दैवत होते.
बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी नव्या जोमाने कामाला लागतील, असा विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी व्यक्त केला. शिवसैनिक ही शिवसेनेची ताकद आहे. बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेना कमकुवत होईल, असे आपल्याला तरी वाटत नाही. पण दोन वेगवेगळ्या सेना असण्यापेक्षा एकच सेना झाल्यास अधिक चांगले होईल. उद्धव आणि राज यांनी एकत्र यावे हाच खरा पर्याय आहे, असेही मुंडे यांचे म्हणणे आहे.
बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर शिवसेना हा चार अक्षरांची शिव आणि सेना अशी  दोन शब्दांमध्ये फोड होईल, असा अंदाज एकेकाळी शिवसेनाप्रमुखांचे निकटवर्तीय असलेल्या पण नंतर शिवसेना सोडून काँग्रेसवासी झालेल्या छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. शिव एकेठिकाणी तर सेना दुसरीकडे असे चित्र बघायला मिळेल. अर्थात, उद्धव आणि राज ठाकरे हे बंधू एकत्र आल्यास शिवसेना अधिक जोमाने उभी राहिल, असा विश्वासही भुजबळ यांनी व्यक्त केला. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांना मात्र बाळासाहेबानंतरही शिवसेना त्याच जोमाने समाजकरण आणि राजकारण करेल, असे मत व्यक्त केले.
बाळासाहेबांच्या मृत्यूमुळे पोकळी निर्माण झाली असली तरी शिवसेना सध्या तरी आपली वाटचाल कायम ठेवेल. उद्धव आणि राज ठाकरे हे दोन बंधू वेगवेगळे झाल्याने भविष्यात शिवसेनेचे भवितव्य काय असेल हे काळच ठरवेल, असा अंदाज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केला.
बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर शिवसेनेतील घडामोडींकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे बारीक लक्ष राहणार आहे. आतापर्यंत मनसेच्या वाढीवर काही मर्यादा होत्या. शिवसेनेतील ओघ लगेचच दुसरीकडे जाईल, अशी चिन्हे नाहीत. उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व कसे असेल यावरच सारे अवलंबून आहे.

Story img Loader