आपण सगळेच उन्हात फिरतो. पण काही जणांचाच उन्हात गेल्यामुळे अचानक मृत्यू का होतो? आपल्या शरीराचं तापमान नेहमी ३७ अंश सेल्सियस असतं, या तापमानातच शरीरातले सर्व अवयव नीट काम करू शकतात. घामाच्या रुपाने पाणी बाहेर काढून शरीर ३७ अंश सेल्सियस तापमान कायम राखतं, सतत घाम निघत असताना पाणी पीत राहाणं अत्यंत गरजेचं आणि अत्यावश्यक आहे. पाणी शरीरात इतरही अधिक महत्त्वाची कामं करतं, त्यामुळे शरीरातला पाण्याचा साठा कमी झाला, तर शरीर घामाच्या रूपाने पाणी बाहेर टाकणं टाळतं. जेव्हा बाहेरचं तापमान ४५ अंशाच्या पुढे जातं आणि शरीरातली कुलिंग व्यवस्था पाण्याच्या अभावाने ठप्प होते, तेव्हा शरीराचं तापमान ३७ अशाच्या पुढे जाऊ लागतं.

शरीराचं तापमान जेव्हा ४२ अंश डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचतं, तेव्हा रक्त तापू लागतं आणि रक्तातलं प्रोटिन अक्षरशः शिजू लागतं. स्नायू कडक होऊ लागतात, त्यात श्वास घेण्यासाठी लागणारे स्नायू ही निकामी होतात. रक्तातलं पाणी कमी झाल्यामुळे रक्त घट्ट होतं, ब्लडप्रेशर अत्यंत कमी होतं, महत्त्वाच्या अवयवांना (विशेषतः मेंदूला) रक्त पुरवठा थांबतो. माणूस कोमात जातो आणि त्याचे एक-एक अवयव अवघ्या काही क्षणांत बंद पडतात आणि त्याचा मृत्यू ओढावतो, अशी माहिती जे. जे. रुग्णालयातील जनऔषध वैद्यकीय विभागाचे डॉ. मधुकर गायकवाड यांनी दिली.

Story img Loader