विनायक परब
मुंबईच्या प्राचीनत्वाचा शोध घेताना काहींच्या संदर्भात त्यांचे पुरावे सापडतात, तर काहींच्या संदर्भात केवळ मुद्दे पण त्यापुढे फारसे काही हाती लागत नाही. इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकापर्यंत सम्राट अशोकाचे साम्राज्य आताच्या मुंबईपर्यंत पसरलेले होते याचा पुरावा नालासोपारा येथे सापडलेल्या अशोकाच्या शिलालेखाच्या एका तुकडय़ाच्या रूपाने आपल्याकडे आज उपलब्ध आहे. मौर्य कालखंडातील एक शिलालेख वाडय़ाला सापडला त्याची माहितीही उपलब्ध आहे. मौर्याच्या संदर्भातील उपलब्ध माहितीनुसार त्यांची या परिसरातील राजधानी ही पुरी येथे होती. त्यामुळेच या परिसराला अगदी सुरुवातीच्या काळात पुरीकोकण असे नाव होते. शिलाहार साम्राज्याच्या अनेक शिलालेखांमध्ये पुरीकोकण असा स्पष्ट उल्लेख येतो. द्वितीय पुलकेशीच्या ऐहोळे शिलालेखातही पश्चिम समुद्राची ऐश्वर्यसंपन्न नगरी म्हणून पुरीचा उल्लेख येतो. मौर्याची राजधानी असाही उल्लेख सापडतो. सुरुवातीच्या कालखंडात पुरी म्हणजे घारापुरी असावी, असे काही संशोधकांना वाटले. मात्र एखादे ठिकाण राजधानी होण्यासाठी ज्या आवश्यक बाबी त्या ठिकाणी असाव्या लागतात, त्या घारापुरीच्या बाबतीत संभवत नाहीत, असे अनेक संशोधकांचे मत होते. राजधानीचे ठिकाण सर्वार्थाने सुरक्षित आणि दळणवळणासाठी सोयीचे असावे लागते. घारापुरीच्या बाबतीत दळणवळण हा भाग तेवढासा सोपा नाही. शिवाय त्या बेटाचा विस्तारही राजधानी व्हावी एवढा मोठा नाही.
मग पुरीचा शोध सुरू झाला त्या वेळेस जंजिऱ्याजवळ असलेल्या राजापुरीकडे संशोधकांचे लक्ष गेले. शिलाहारांच्या वेळेस सध्याच्या विद्यमान कोकणाचे उत्तर आणि दक्षिण असे दोन भाग होते. त्याचे पुरावे मिळतात, त्यांचे राज्यकर्ते हे वेगवेगळे होते. मुंबईच्या संदर्भात विचार करता हा भाग उत्तर कोकणामध्ये येतो. उत्तर कोकणाची हद्द ही राजापुरीपर्यंत होती हे खरे असले तरी सर्वसाधारणपण कोणत्याही राज्याची राजधानी ही शक्यतो त्या राज्याच्या एका टोकाला असत नाही. राजापुरीचा भाग हा उत्तर कोकणाच्या दक्षिण टोकाला येतो. त्यामुळे राजापुरीचा राजधानी म्हणून असले उल्लेखही तेवढासा पटणारा नाही, असे अनेक तज्ज्ञांना वाटते. किमान उत्तर कोकणची राजधानी म्हणून तिला तार्किक व भौगोलिकदृष्टय़ा फारशी पुष्टी मिळत नाही. मात्र त्या परिसरामध्ये पुरातत्त्वीय बाबी मोठय़ा प्रमाणावर सापडतात, असे अलीकडच्या काही सर्वेक्षणांमध्ये लक्षात आले होते. मुंबई विद्यपीठाच्या बहि:शाल शिक्षण विभागाने तर इथेच जवळ असलेल्या चांदारे गावामध्ये केलेल्या उत्खननामध्ये त्याचे प्राचीनत्व सिद्ध करण्यात त्यांना यश आले. असे असले तरी पुरी म्हणून त्या परिसराला राजधानी अद्याप मान्यता मिळालेली नाही.
सोपारा हे राजधानीचे ठिकाण होते, याचे पुरावे अस्तित्वात आहेत. त्यानंतर थेट उत्तर कोकणच्या शिलाहारांच्या कालखंडात श्रीस्थानक म्हणजे आताचे ठाणे हे राजधानीचे ठिकाण होते, याचे पुरावे मिळतात. मात्र मधल्या कालखंडाचे पुरावे फारसे सापडत नाहीत. मात्र त्याबाबतची काही अनुमाने ही अनेक संशोधकांनी व्यक्त केली आहेत. त्यातीलच एक असलेल्या कझिन्सच्या मतानुसार साष्टी बेटाच्या उत्तरेस असलेल्या भागातील मरोळ (त्याने त्याचे नाव मारोळ असे लिहिले आहे) हे कदाचित तत्कालीन पुरी असावे. त्याच्या मतानुसार या मधल्या कालखंडामध्ये जिचा उल्लेख पुरी असा येतो ते ठिकाण ठाणे जिल्ह्य़ामध्येच कुठे तरी असावे. तत्कालीन मरोळच्या एका टोकापर्यंत समुद्र खाडीमार्गे आत येत होता, असे त्या वेळचे संदर्भ आजही उपलब्ध आहेत. शिवाय मरोळ परिसरामध्ये मोठय़ा आकाराच्या देवालयाचे पुरावशेषही मोठय़ा प्रमाणावर सापडले आहेत. मरोळ हे महत्त्वाचे ठिकाण होते यात शंकाच नाही. कारण साष्टीच्या संदर्भात ज्या दोन साष्टींचा उल्लेख महिकावतीच्या किंवा साष्टीच्या बखरीमध्ये येतो त्यात मालाड व मरोळ साष्टी असा उल्लेख आहे. मात्र मरोळचा उल्लेख पुरी म्हणून आल्याचा संदर्भ मात्र आपल्याला कुठेच सापडत नाही. त्याचा पुरावा आजवर मिळालेला नाही. दुर्दैवाने मरोळच्या प्राचीनत्वावर फारसा अभ्यास झालेला नाही. तिथे सापडलेल्या पुरातत्त्वीय गोष्टींची नोंदही म्हणावी तशी व्यवस्थित झालेली नाही, हे अभ्यासांती लक्षात येते.