राष्ट्रगीतामध्ये ‘सिंध’ हा शब्दप्रयोग कायम ठेवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी केली जात आहे का आणि शब्दप्रयोगाबाबत केलेली चूक सुधाण्यासाठी काय पावले उचलली जात आहेत, याचे स्पष्टीकरण देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकारला दिले.
नववी आणि दहावीच्या पुस्तकात राष्ट्रगीतातील ‘सिंध’ या जागी ‘सिंधू’ असा शब्दप्रयोग केला असल्यामुळे ही पुस्तके रद्द करण्याची मागणी करणारी याचिका दक्षता शेठ यांनी केली आहे. मराठी माध्यमाच्या भूगोलच्या पुस्तकात ‘सिंध’ऐवजी ‘सिंधू’ असे छापण्यात आले आहे. त्याला शेठ यांनी आक्षेप घेत पुस्तके परत मागविण्याचे आणि चूक सुधारण्याचे आदेश देण्याची मागणी याचिकेद्वारे केली. राष्ट्रगीतामध्ये ही चूक असलेली तब्बल सात लाख पुस्तके छापण्यात आली आहेत आणि याबद्दल सरकार लवकरच निर्णय घेणार आहे, असे आश्वासन सरकारतर्फे यापूर्वी देण्यात आले होते.
राज्य सरकारतर्फे चूक सुधारण्याचे काम काही केले जात नसल्याचे शेठ यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळेच काही पुस्तकांमध्ये राष्ट्रगीतातून शब्दच वगळून टाकण्यात आला आहे, तर काही पुस्तकांमधून राष्ट्रगीताच्या पानाचा समावेशच नसल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले. तर ‘सिंध’ हा चुकीचा शब्दप्रयोग असून ‘सिंधू’ हा योग्य शब्दप्रयोग असल्याचा दावा करणारी दुसऱ्या याचिकाकर्त्यांने याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाबाबत न्यायालयाला माहिती दिली. परंतु सर्वोच्च न्यायालयाने ‘सिंध’ हा शब्दप्रयोगच कायम ठेवण्याचे शेठ यांनी निदर्शनास आणून दिल्यावर राज्य सरकारतर्फे त्याची अंमलबजावणी केली जात आहे की नाही, अशी विचारणा न्यायालयाने केली. त्यावर केंद्र सरकारतर्फे अद्याप तशा सूचना आल्या नसल्याचे राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आल्यावर संतापलेल्या न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिलेले असताना केंद्र सरकारवर अवलंबून राहण्याची गरज काय, असा सवाल केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा