उद्धव ठाकरेंनी मुंबईसाठी २५ वर्षांत काय केलं? निवडणूक आली की त्यांचा एकच डायलॉग असतो मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून कुणाच्या बापाच्या बापाचा बाप आला तरीही तोडू शकणार नाही. आता तरी डायलॉग बदला असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. एवढंच नाही तर २५ वर्षात मुंबईकरांसाठी उद्धव ठाकरेंनी काय केलं? असाही सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
“पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मुंबईकरांनी मनापासून प्रेम केलं आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये याचा प्रत्यत आपल्याला आला. तसंच २०१७ मध्येही मुंबईकरांनी दाखवून दिलं की त्यांचं मोदींवर किती प्रेम आहे. देशातला कुठलाही सर्व्हे काढला तरीही मुंबईत असे सर्वाधिक लोक आहेत ज्यांचं मोदींवर प्रचंड प्रेम आहे. लोक मोदींना आपलं मानतात.” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आज भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा मुंबईत आले होते. त्यांनी आज भाजपाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. त्याच कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं आहे.
मुंबईकरांचं मोदींवर प्रेम आहे म्हणूनच त्यांना भरभरुन मतदान
“मी दाव्याने सांगतो, मोदींवर सर्वाधिक प्रेम कुठे आहेत तर मुंबईत आहेत. मोदींना भरभरुन मतं दिली गेली आहेत. मोदींच्या कामावर भाजपाला मतं मिळाली. मात्र दुर्दैवाने आमचे जे जुने मित्र होते ते मोदींचा लाईफसाईज फोटो लावायचे आणि निवडणूक आली की त्यांच्या पोस्टरवरचा उद्धव ठाकरेंचा फोटो स्टँपसाईज असायचा. मोदींच्या नावे मतं मागायची आणि निवडून आले की मोदींच्या नावाने शिमगा करायचा हेच उद्धव ठाकरेंनी केलं. रोज आपल्यावर टीका करायचे, मोदींनी केलेल्या उत्तम कामांवर पाणी टाकण्याचं काम उद्धव ठाकरे करायचे. आता उद्धव ठाकरेंना खरं लक्षात येणार आहे की मुंबईत लोक कुणाच्या पाठीशी आहेत. या निवडणुकीत त्यांना कळलं आहे. कारण या निवडणुकीत आपल्याबरोबर मोदी तर आहेतच. पण मुंबईत आपल्या बरोबर हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची खरी शिवसेना आहे. एकनाथ शिंदे त्याचं नेतृत्व करत आहेत.”
उद्धव ठाकरेंना माझा सवाल आहे..
आपल्याला मुंबईतल्या सहा जागा निवडून आणायच्या आहेत. मी तर उपस्थितांना विचारतो. इतके वर्षे आपण त्यांचंच गुणगान गायलं. महापालिकेत शिवसेनेकडेच सत्ता होती. आपण त्यांचे नारे दिले, त्यांना समर्थ दिलं. माझा सवाल आहे उद्धव ठाकरेंना २५ वर्षात तुम्ही केलेलं मुंबईकरांसाठीचं एक काम दाखवा. ते दाखवू शकत नाहीत. मुंबईच्या परिवर्तनाचं काम मोदींच्या नेतृत्वात आम्हीच केलं आहे. मुंबईचा कोस्टल रोड, मुंबई मेट्रो, रेल्वे जाळ्याचं विस्तारीकरण ही कामं आम्हीच केली आहेत. मुंबईत दोन कोटी लोकांचं शौचाचं सांडपाणी हे समुद्रात सोडलं जात होतं. २५ वर्षात ते पाणी ट्रिट करुन सोडलं पाहिजे इतकंही तु्म्ही करु शकला नाहीत. ते करण्यासाठी आम्हाला सत्तेवर यावं लागलं. असाही टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
हे पण वाचा- “छत्रपती शिवरायांची पहिली आरती स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिली, ती आता…”, देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्य
मुलगा १८ वर्षांचा झाला की त्याला मिसरुड फुटतंच
मी उबाठा सेनेच्या एका नेत्याशी बोलत होतो. त्यांना विचारलं तुम्ही काय कामं केली? मला म्हणाले मुंबईत रस्ते झाले, पूल बांधण्यात आले. मी त्यांना म्हटलं अहो पूलही गडकरींनीच बांधले आहेत. तुम्ही ते केलेले नाहीत. तुम्ही जे सांगताय ना झालं, त्याबद्दल आमचे प्रमोदजी नेहमी म्हणायचे की मुलगा १८ वर्षांचा झाला की त्याला मिसरुड फुटतेच. त्यामुळे तुम्ही जे २५ वर्षात केलंत ते तुमचं कर्तृत्व नाही. महापालिकेने इतकंही केलं नसतं तर महापालिकाच राहिली नसती. एकही गोष्ट ते सांगू शकत नाही की मुंबईकरांच्या जीवनात बदल करण्यासाठी आम्ही या गोष्टी केल्या. बीडीडी चाळीत मराठी माणसाला घर आपण मिळवून दिलं. धारावीच्या प्रकल्पासाठी मोदींना आणि भाजपालाच यावं लागलं. असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
गरीबांचा विचार, चाळकऱ्यांचा विचार हा जर कुणी केला असेल तो भाजपाने केला. निवडणूक आली की यांची (उद्धव ठाकरे) ढोंगबाजी सुरु होते. आता निवडणुका आल्या की मुंबई तोडण्याचा डाव आहे सांगतील. आता हे ढोंग बंद करा असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.