छत्रपती शिवाजी महाराजांसह अन्य महापुरषांबाबत मागील काही दिवसांमध्ये करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं आहे. राज्यपाल कोश्यारी आणि भाजपा नेत्यांकडून करण्यात आलेल्या विधानांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली असून, शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात उद्या महाविकास आघाडीने मुंबईत मोर्चाचे आयोजन केले आहे. तर दुसरीकडे शिवसेना(ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांचा विरोधात भाजपाचे कार्यकर्तेही रस्त्यावर उतरणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
फडणवीस म्हणाले, “जो काही मोर्चा आहे तो शांतपणे व्हावा, त्यासाठी जी काही परवानगी आहे ती दिलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की लोकशाही पद्धतीने कोणाला विरोध करायचा असेल, तर ते विरोध करतील. कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहील एवढ्या पुरतं सरकारचा त्यामध्ये हस्तक्षेप असेल.”
हेही वाचा – …म्हणून कोकण दौऱ्यावरून आल्यानंतर राज ठाकरेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
याशिवाय मोर्चाला परवानगी मिळालेली नाही असं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे, यावर फडणवीस म्हणाले, “मला असं वाटत नाही माझ्या माहितीप्रमाणे महाविकास आघाडीच्य मोर्चाच्या मार्गासंदर्भात त्यांच्याशी चर्चा झालेली आहे. त्यांनी सांगितलेलाच मार्गच जवळपास मान्य केलेला आहे. त्यामुळे मला वाटत नाही की काही परवानगीची अडचण आहे.”
हेही वाचा – मुंबई : मोर्चासाठी वाहतूक बदल
याचबरोबर, “आमचे मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनीदेखील ही घोषणा केली आहे की, आज ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वारकरी, संतांबद्दल बोलत आहेत. ज्या प्रकारे राम-कृष्णाबद्दल त्यांचे उद्गार आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांबद्दल त्यांच्यावतीने काहीतरी बोललं जातय. अशाप्रकारच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टींबाबत लोकांच्या मनात मोठा संताप आहे. तर तो निश्चितपणे व्यक्त करावा लागेल.” असंही यावेळी फडणवीसांनी सांगितलं.