अडीच लाख खर्चून सुविधा; आता गावाच्या विकासाचा ध्यास
निव्वळ गमतीजमतीकरिता ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर एकत्र आलेल्या ताडदेवच्या ‘जलसा’नामक मित्रांच्या गटाने याच समाजमाध्यमाचा विधायक वापर करत डहाणूतील धरमपूर येथील आदिवासीबहुल भागातील जिल्हा परिषद शाळेचा कायापालट घडवून आणला आहे. आपल्या खिशातले तब्बल अडीच ते तीन लाख रुपये खर्च करून शाळेला ज्या ज्या म्हणता येतील त्या भौतिक व शैक्षणिक सुविधा पुरवून झाल्यानंतर आता या गटाला शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासाबरोबरच रोजंदारीवर जगणाऱ्या गावाचाही कायापालट करण्याच्या ध्यासाने झपाटले आहे.
सुरुवातीला हा गट केवळ १० जणांपुरता मर्यादित होता, पण ‘प्रकाश बाबा आमटे’ हा मराठी चित्रपट पाहिल्यानंतर प्रेरित झालेल्या या तरुणांच्या गटावरील चर्चेचा नूरच पालटला. सुरुवातीला इतरांप्रमाणेच हा गटदेखील हास्यविनोद, शुभेच्छा संदेशांची देवाणघेवाण, वादविवादातच रमला होता. पण, समाजाशी म्हणून आपली काही बांधिलकी नाही का, प्रश्न या चर्चेतून त्यांना टोचत होता. त्यातल्या चार जणांनी मग एके दिवशी गाडी काढली. कुठलीही दिशा नाही की योजना नाही. हा दिशाहीन प्रवास त्यांना डहाणूतल्या धरमपूर गावात घेऊन आला. गावकऱ्यांकडे चौकशी केली असता इथल्या शाळेची स्थिती फारच वाईट असल्याचे समजले.पहिली ते सातवीपर्यंतच्या या शाळेत एकूण १६३ मुले. पण मुलांसाठी जिथे खिचडी बनते, त्या स्वयंपाकगृहाला दारच नव्हते. त्यामुळे तिथे सर्वत्र उंदीर, घुशी, कुत्र्यांचा वावर. वीज आहे, पण पंख्यांची सोय नाही. संगणकसारख्या अत्याधुनिक सुविधा विचारूच नका.
बहुतांश विद्यार्थ्यांचे पालक खाणीवरचे रोजंदारीचे मजूर, अशिक्षित.शाळेची, गावाची माहिती घेईपर्यंत सूर्य कलला. मग या तरुणांनी घर गाठले तेच गावात कुवतीनुसार काम करण्याच्या धेय्याने झपाटून. दहा जणांच्या गटाला ५० ते ६० समविचारी जोडले गेले. ‘जलसा’ला दिलेले ‘शेअरिंग फॉर हॅपीनेस’ हे उपनाम सार्थ करण्यासाठी ग्रामस्थांसाठी काम करण्याचा प्रयत्न असल्याचे ‘अ‍ॅडमिन’ अभिजीत चाळके याने सांगितले

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

* कुणी पैशाची, तर कुणी वस्तुरूपाने मदत केली.
* या मदतीतून शाळेला रंग चढला. गटातल्याच काही व्यावसायिक कलाकारांनी शाळांच्या भिंती चित्रांतून बोलक्या केल्या.
* मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, विहिरीला मोटार, पाण्याची टाकी, नळ, कौलारू छप्पर, फरशा बसविल्या गेल्या.
* दूरचित्रवाणी संच, संगणक यंत्रणा, घडय़ाळ, पुस्तके, ई-लर्निगचे साहित्य दिले गेले.
’प्रत्येक मुलाला दप्तर, पुस्तके, वह्य़ा, छत्री, रेनकोट, चपला पुरविण्यात आले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whatsapp group friends help to district council school