तुमच्या मोबाइलमधील माहितीवर कुणाची तरी नजर आहे. ही माहिती कुठेतरी कुणीतरी वाचत आहे. तिचा कधीतरी दुरुपयोगही होऊ शकतो.. इतकी वष्रे केवळ चर्चेत असणाऱ्या या गोष्टींमध्ये तथ्य असल्याचे आता सिद्ध झाले आहे. अँड्रॉइड या ऑपरेटिंग सिस्टिमवर चालणारी दोनशेहून अधिक अॅप्लिकेशन सायबर गुन्ह्य़ांसाठी पोषक असून, ती वापरणाऱ्यांसाठीही धोकादायक आहेत. यामध्ये व्हॉट्स अॅप, वुई चॅट, ट्र कॉलर अशा संवाद/संभाषणासाठी वापरल्या जाणाऱ्या लोकप्रिय अॅप्सचाही समावेश आहे.
‘व्हॉट्सअॅप’ला ‘टेलिग्राम’ची टक्कर!
दिल्लीतील ‘इन्फॉर्मेशन शेअरिंग अँड अनॅलिसिस सेंटर’ (आयएसएएस)मधील ‘कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम’ (सीईआरटी)ने गुगल प्लेवरून मोठय़ा प्रमाणावर डाऊनलोड केल्या जाणाऱ्या सुमारे ४५० अॅप्सची नुकतीच सहा पातळय़ांवर सुरक्षा चाचणी केली. कोणत्या अॅपपासून किती धोका आहे याचीही त्यांनी नोंद केली. त्यात बहुतांश अॅप्स मोबाइलमधील आपली माहिती संकलित करत असल्याचे निदर्शनास आले. व्हॉट्स अॅप आपल्या फोनमध्ये येणारे संदेश, सिस्टिममधील कमांड, आपल्या ठिकाणाची माहिती आणि युनिक आयडी या सर्व गोष्टी त्यांच्या सव्र्हरवर नोंद करून ठेवत असते. म्हणजे हे अॅप विकसित केलेल्या कंपनीकडे आपली ही माहिती कोणत्याही वेळी उपलब्ध होऊ शकते. ही बाब आपल्या दृष्टीने धोकादायक आहे. व्हॉट्स अॅपप्रमाणे अन्य चॅटिंग/मेसेजिंग अॅप्सही अशाच प्रकारे वापरकर्त्यांच्या माहितीची चोरी करत असल्याचे दिसून येते.
संस्थेने तयार केलेला अहवाल केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला आहे. या संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे आवश्यक असल्याचे ‘सीईआरटी-आयएसएएस’चे संचालक राजशेखर मूर्ती यांनी स्पष्ट
केले. या अहवालानुसार सायबर गुन्हेगारांचे नवे लक्ष्य हे मोबाइल फोन्स असणार आहेत हे समोर आल्याचेही मूर्ती म्हणाले.
व्हॉट्सअॅपचा स्पर्धक बनून दक्षिण आफ्रिकेचे ‘मिक्सिट’ भारतात दाखल
‘गुगल प्ले’पेक्षा ‘आयटय़ून्स’ सुरक्षित गुगल प्लेवर अॅप पोस्ट करण्यासाठी कोणतीही यंत्रणा अथवा मार्गदर्शक तत्त्वे उपलब्ध नाहीत. कुणीही व्यक्ती कोणत्याही प्रकारचे अॅप तयार करून ते अॅप गुगल प्लेवर मोफत किंवा विकत उपलब्ध करून देऊ शकते. यासाठी अॅप बनविणाऱ्या कंपनीने गुगल प्लेवर २५ डॉलर जमा केले की ते अॅप अपलोड होते. याच्या नेमके उलट अॅपलच्या आय टय़ून्सच्या बाबत आहे. अॅपलच्या कोणत्याही अॅप स्टोअरवर नवीन अॅप पोस्ट करण्यापूर्वी अॅप विकसित करणाऱ्या कंपनीला अॅपलच्या तज्ज्ञांकडे अॅपचे सर्व कोड्स द्यावे लागतात. या कोडवरून सुरक्षेची तपासणी झाल्यानंतरच ते अॅप अॅपल कंपनी त्यांच्या स्टोअरवर उपलब्ध करून देत असते. गुगल प्लेसाठीही अशाच पद्धतीची गरज आहे.
‘प्रीमियम एसएमएस’ घोटाळा
आपल्याला अनेक अॅप्स मोफत दिली जातात. या मोफत अॅप असलेल्या कंपन्यांचे ‘अर्थार्जन’ कसे होते याचा विचार केला तर असे दिसून येते की आपल्याकडून विविध मार्गानी माहिती गोळा करणे, ऑनलाइन क्रियांमध्ये गुंतवणे असे प्रकार केले जातात. यातून अर्थार्जन होत असते. यातीलच एक प्रकार म्हणजे प्रीमियम एसएमएस स्कॅम हा आहे. यामध्ये एक विशिष्ट प्रकारचे अॅप तयार केले जाते. त्या माध्यमातून आपणास विविध ठिकाणी एसएमएस पाठविण्यास सांगितले जाते. आपण ते पाठवतो तेव्हा अॅप निर्मात्या कंपनीला त्यातील पैसे मिळतात. हाच ‘प्रीमियम एसएमएस’ घोटाळा.
धोका काय?
ही अॅप्स फोनमध्ये येणारे व पाठविले जाणारे संदेश तसेच सिस्टिम कमांड्स, लोकेशन डेटा, युनिक आयडी आणि इंस्टॉल पॅकेजेस याची माहिती त्यांच्याकडे संकलित करून ठेवतात. या सर्व अॅपवर कोणत्याही प्रकारचे र्निबध नसल्यामुळे ती सायबर गुन्हेगारांना मदतच करतात.
लोकप्रिय पण धोकादायक
मोबाइल सिक्युरिटी अँड अँटीव्हायरस, क्विक हिल मोबाइल सिक्युरिटी फ्री, कॉल ब्लॉकर, व्हॅल्युट हाइड-एसएमएस पिक्स अँड व्हिडीओ, सॅनशॉट, अँटीव्हायरस सिक्युरिटी फ्री, नेक्स्ट लाँचर थ्रीडी शेल लाइट
अँटीव्हायरस नव्हे ‘डेंजरस’!
अँटीव्हायरसचे अनधिकृत अॅप तुम्ही डाऊनलोड केले तर ते सर्वप्रथम फोन स्कॅन करते. त्यातून फोनमधील सर्व कॉन्टॅक्टस, एसएमएस इतकेच नव्हे तर आयएमईआय क्रमांकही स्कॅन होतो आणि ही माहिती कुठल्यातरी अनोळखी सव्र्हरवर नोंदली जाते. अशा मोफत अँटीव्हायरस अॅपच्या माध्यमातून तुम्ही फोन स्कॅनिंग केल्यावर प्रारंभी काही दिवस व्हायरस सापडल्याचे दाखविले जाते. पण कालांतराने ते बंद होते. म्हणजे या अॅपमधून व्हायरस घालविणे दूरच; उलट माहिती चोरली जाते, असे सीईआरटीने म्हटले आहे.
‘व्हॉट्सअॅप’पासून मोबाइलला धोका
तुमच्या मोबाइलमधील माहितीवर कुणाची तरी नजर आहे. ही माहिती कुठेतरी कुणीतरी वाचत आहे. तिचा कधीतरी दुरुपयोगही होऊ शकतो..
First published on: 16-02-2014 at 01:09 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whatsapp security threat for mobile