मुंबई : संवादाच्या महापुरात गढलेल्या व्हॉट्सअ‍ॅप धारकांचा मंगळवारी दुपारी १२ नंतर ठोका चुकला. टंकलेला संवाद आणि नोंदलेला ध्वनी समोरच्याला पोहोचल्याची काडीपोच मिळण्याऐवजी गोठलेला चौकोन पाहत कित्येक वेळ व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांची संवादभूक चिंतेमध्ये परावर्तित झाली. आपल्याच भ्रमणध्वनी यंत्रणेत, मोबाइल कंपन्यांच्या सेवेत बिघाड झाल्याचा वैयक्तिक समज काही काळात समूहभर पसरला आणि मग संवादाच्या व्हॉट्सअ‍ॅपपूर्वकालीन आयुधांचा वापर अनेकांनी कित्येक वर्षांनी केला.

 दूरवरील व्यक्तीशी संवाद साधताना संदेश आणि उत्तरातील वेळ तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबर कमी होत गेला. हजारो किलोमिटर दूर असलेल्या आप्तांची क्षणात आणि अत्यल्प खर्चात खबरबात मिळण्याची सवय व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅपने गेले दहा वर्षे लावली आहे. दुपारच्या सुमारास दिवाळीच्या शुभेच्छा वाचण्यात आणि एकमेकांना छायाचित्रे पाठविण्यात व्यस्त असलेले सर्व व्हॉट्सअ‍ॅप बंद झाल्यावर त्रस्त झाले. दिवाळीच्या भरमसाठ शुभेच्छांचे संदेश आणि छायाचित्रांमुळेच व्हॉट्सअ‍ॅप ठप्प झाल्याची अफवा सुद्धा पसरू लागली. दुसरीकडे हा सायबर हल्ला असण्याचीही शक्यता वर्तवली गेली. अनेक क्षेत्रांच्या कामकाजात व्हॉट्सअ‍ॅप हे महत्वाची भूमिका बजावत असल्यामुळे कार्यालयांमध्ये सुद्धा गोंधळ उडाला. दैनंदिन बैठका सुद्धा खोळंबल्या. संदेशाची देवाणघेवाण होत नसल्यामुळे गैरसमजही निर्माण झाले. परिणामी अनेक महत्वाची कामे रखडली. त्यामुळे कार्यालयांमध्ये पर्यायी मार्ग म्हणून ई-मेलचा वापर केला. त्याचवेळी इतर समाजमाध्यमांवर मजेशीर मीम्सचा धुमाकूळ सुरू झाला.

व्हॉट्सअ‍ॅपची मालकी असलेल्या मेटाकडे तक्रारींचा ओघ हा सुरुच होता आणि वापरकर्त्यांकडून ट्विटरवर संतापाची लाट पसरली होती. सुरुवातीला व्हॉट्सअ‍ॅपच्या सव्‍‌र्हरमध्ये बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. यासंदर्भात काही कालावधीनंतर व्हॉट्सअ‍ॅपकडून अधिकृतरीत्या प्रतिक्रिया देताना ‘लवकरात लवकर बिघाड दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करत आहोत’, अशी माहिती देण्यात आली. त्यानंतर दुपारी सव्वा दोनच्या सुमारास संदेश येणे-जाणे सुरु झाले आणि व्हॉट्सअ‍ॅपची सेवा पूर्ववत झाल्यामुळे वापरकर्त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

कार्यकर्ते चिंताग्रस्त

अलीकडेच महाराष्ट्रात राजकीय घडामोडी आणि अभूतपूर्व सत्तांतरानंतर नेते, कार्यकर्ते संपर्कात नसल्याचे पाहून राजकीय नेत्यांमध्येसुद्धा चिंतेचे वातावरण निर्माण झाले. कार्यकर्ते आणि नेत्यांकडून व्हॉट्सअ‍ॅपवरील संदेशांना प्रतिसाद येत नसल्यामुळे राजकीय क्षेत्रातही गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

पडताळणीला ऊत

कुणी स्वत:चा मोबाईल बंद-चालू करून पाहिला तर कोणी ‘एअरप्लेन मोड’ ऑन-ऑफ करून पाहिले. काहींनी डेटा पॅकेज संपले का, हे तपासले. घरातील वाय-फाय बंद झाले आहे का, हेसुद्धा तपासून पाहिले. व्हॉट्सअ‍ॅप अनइन्स्टॉल करून पुन्हा इन्स्टॉल करून पाहिले.

ब्लॉकभीतीचाही प्रसार..

समोरच्याने ब्लॉक केले नाही ना याची धास्ती अनेकांना वाटू लागली. नेमके काय घडले आहे, याचा अदमास घेण्यासाठी अखेर एकमेकांना फोन करून विचारपूस सुरू झाली. व्हॉट्सअ‍ॅप संदेशांची सवय झाल्यानंतर खूप काळाने कुणाशी फोनवर संवाद साधल्याची प्रतिक्रियाही अनेकांनी दिली.

Story img Loader