मुंबई : मालेगाव गैरव्यवहार प्रकरणात वापरण्यात आलेल्या व्हॉटसअॅप समूहाचा शोध घेण्यात सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) यश आले असून आरोपींनी हवाला व्यवहाराच्या समन्वयासाठी हा ग्रुप तयार केला होता. त्या समूहामार्फत हजारो कोटींचे हवाला व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. ही रक्कम देवाण-घेवाण करण्यासाठी पाच रुपयांच्या विशिष्ट नोटेचा वापर करण्यात येत होता, अशी माहिती ईडीच्या तपासात उघड झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार महमूद अब्दुल समद भागड ऊर्फ ‘चॅलेंजर किंग’ सध्या फरार असून, साथीदार जिमीसोबत त्याने हवाला नेटवर्क उभे केले होते. त्याबाबत समन्वय करण्यासाठी त्याने ‘एएमडी’ नावाचा व्हॉट्सअॅप समूह तयार केला होता. भागड या ग्रुपचा अॅडमिन होता. त्याच्या सूचनेनुसार, सर्व आर्थिक व्यवहार सुरू होते. अटक आरोपी नगानी अकबर मोहम्मद शफी आणि वसीम भेसानिया यांच्यावर बँक खात्यांमधून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम काढून ती हवाला नेटवर्कमार्फत हस्तांतरित करण्याचे काम सोपवण्यात आले होते.

आरोपींनी या समूहामार्फत एक हजार कोटी रुपयांचे व्यवहार केल्याचे निष्पन्न झाले असून त्यासाठी एन्क्रिप्टेड प्रणालीचा वापर करण्यात आला होता.ईडीने डिसेंबर २०२४ मध्ये याप्रकरणी भागड, शफी आणि भेसानिया यांच्या ठिकाणी छापे टाकले. त्यात सहा मोबाइल संच आणि दोन मेमरी कार्ड, ५३ बँक खात्यांची माहिती मिळाली. बँक खात्यांमध्ये ४९ लाख २९ हजार १२५ रुपये शिल्लक होते. व्हॉट्सअॅप समूहाचे डिजिटल रेकॉर्डही ईडीच्या हाती लागले होते. त्यात शेल कंपन्यांची बँक खाती, आर्थिक व्यवहारांचे रेकॉर्ड आणि अहमदाबादमधील सहा शेतीविषयक कंपन्यांची माहिती मिळाली होती.

पाच रुपयांच्या नोटांचा वापर

शफी आणि भेसानियाने भागडच्या आदेशानुसार, ऑगस्ट २०२४ ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत मोठ्या प्रमाणात रोखीने रक्कम काढली होती. ही रक्कम वितरित करण्यासाठी पाच रुपयांच्या नोटांचा टोकन म्हणून वापर करण्यात येत होता. ही रक्कम सायबर फसवणूक, ऑनलाइन गेमिंग आणि बेटिंग अॅप्सच्या माध्यमातून कमवण्यात आल्याचा संशय आहे. या संपूर्ण गैरव्यवहारात आरोपींनी २३ बँक खात्यातून ३१७ कोटी रुपये व्यवहारात आणले. ही रक्कम हवाला नेटवर्कद्वारे इतरत्र वळवण्यात आली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whatsapps hawala in malegaon scam transactions worth rs 1000 crore found mumbai news amy