गणेशोत्सवाच्या काळात कोकणाकडे जाणाऱ्या नेहमीच्या गाडय़ांतील जागांचे  आरक्षण पंधरा मिनिटांत संपल्यानंतर आता या चाकरमान्यांचे लक्ष रेल्वेतर्फे सोडण्यात येणाऱ्या विशेष गाडय़ांकडे लागले आहे. मात्र आषाढ निम्मा सरला, तरीही मध्य रेल्वेकडून या गाडय़ांबाबात कोणतीही घोषणा होत नसल्याने गावाच्या गणपतीला आपला नमस्कार घडणार का, असा प्रश्न या चाकरमान्यांना सतावू लागला आहे. मात्र, या प्रश्नाची उकल येत्या आठवडय़ात करण्याचे संकेत मध्य रेल्वे प्रशासनाने दिले आहेत.
यंदाही गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या गाडय़ांचे आरक्षण सुरू झाल्यानंतर पंधराव्या मिनिटाला पूर्ण झाले. यात तिकिट दलालांचाही मोठा हात असल्याची चर्चा चाकरमान्यांमध्ये होती. रेल्वेचा पर्याय बाजूला टाकत चाकरमान्यांनी खासगी गाडय़ा, बसने गणेशोत्सवाला जाण्याची योजना आखण्यास सुरुवात केली. मात्र खड्डय़ांमुळे झालेली मुंबई- गोवा महामार्गाची चाळण पाहता अनेकांनी मध्य रेल्वेतर्फे जादा विशेष गाडय़ांची घोषणा कधी होत आहे, याची वाट पाहणेच पसंत केले आहे.
गेल्या वर्षी मध्य रेल्वेने गणेशोत्सवादरम्यान कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाडय़ांच्या १३६ फेऱ्या चालवल्या होत्या. त्याच्या आधी २०११ मध्ये ही संख्या १०२ होती. त्यामुळे यंदा चाकरमान्यांना मध्य रेल्वेकडून किमान १३६ पेक्षा जास्त फेऱ्यांची अपेक्षा आहे. मात्र आधीच या मार्गावर चालवण्यात येणाऱ्या गाडय़ा व विशेष गाडय़ा, यांचे गणित कसे जमवायचे, ही चिंता मध्य रेल्वेला भेडसावत आहे.
तरीही चाकरमान्यांना गणपतीसाठी कोकणात जायला मिळावे, यासाठी मध्य रेल्वे विशेष गाडय़ा सोडणार असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अतुल राणे यांनी आधीच सांगितले. कोकणात सोडण्यात येणाऱ्या जादा गाडय़ांचा आराखडा तयार आहे. पुढील आठवडाभरात गाडय़ांची व फेऱ्यांची संख्या, तिकीट आरक्षणाच्या तारखा आदी बाबी जाहीर करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे कोकणात जाण्यासाठी उत्सुक असलेल्या चाकरमान्यांना येत्या आठवडय़ाभरात शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे.