मुंबई : ज्येष्ठ कवी-साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या नावाने दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात सुरू होणाऱ्या मराठी अध्यासन केंद्राचे उद्घाटन व छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राचा पायाभरणी समारंभ हे दोन्ही कार्यक्रम अचानक पुढे ढकलण्यात आले. राज्याच्या सांस्कृतिक मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीतून मंगळवारी ही बाब स्पष्ट झाली. या दोन्ही अध्यासन केंद्रांची प्रक्रिया मराठी भाषा दिनी, गुरुवारी २७ फेब्रुवारी रोजी सुरू होणे अपेक्षित होते.
मराठी भाषेच्या विकासासाठी व अभ्यासासाठी ‘जेएनयू’मध्ये कुसुमाग्रज अध्यासन केंद्र सुरू होणार असून राज्य सरकारने १० कोटींचा निधी दिला आहे. या केंद्राच्या उद्घाटनाची घोषणा दिल्लीत मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनी केली होती. तसेच, दिल्लीत पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या सांगता समारंभातही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी या केंद्राचे भव्य उद्घाटन २७ फेब्रुवारीला होणार असल्याचे जाहीर केले होते. पण, शिंदे व पवारांच्या घोषणेनंतर दोनच दिवसांनी उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे समजते.
‘जेएनयू’मधील उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार उपस्थित राहणार होते. ‘जेएनयू’च्या कुलगुरू शांतिश्री धुलिपुडी पंडित, कुलपती कंवल सिब्बल व ‘स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज’चे डीन अमिताभ मट्टू यांच्या वतीने निवडक लोकांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, हा कार्यक्रम अपरिहार्य कारणांमुळे पुढे ढकलण्यात आल्याचे मंगळवारी निमंत्रितांना कळवण्यात आल्याचा दावा राज्याच्या सांस्कृतिक मंत्रालयातील सूत्रांनी केला.
पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटनाचा प्रयत्न?
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार असले तरी, दोन्ही अध्यासन केंद्रांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचा प्रयत्न राज्य सरकारमधील काही मंडळींकडून केला जात असल्याचे समजते. मोदींच्या उपस्थितीसाठी ‘जेएनयू’च्या कुलगुरू शांतिश्री पंडित यांनीही पुढाकार घेतला असून केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या उच्चशिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारीही प्रयत्नशील आहेत, असे मंत्रालयातील सूत्रांचे म्हणणे आहे. याबाबत राज्य सरकारकडून मात्र अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही.