मुंबई : गेली दोन टर्म उत्तर मध्य मुंबईत काँग्रेस पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढावणाऱ्या प्रिया दत्त आहेत कुठे असा प्रश्न विचारला जात आहे. प्रिया दत्त या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असल्याचीही चर्चा आहे. मात्र प्रत्यक्ष दत्त यांनीच ही शक्यता फेटाळून लावली आहे.
एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर मध्य मुंबई या मतदारसंघातून दोन वेळा लोकसभेवर निवडून गेलेल्या प्रिया दत्त यांचे नाव लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. गेल्या सलग दोन निवडणुकांत दत्त यांना हार पत्करावी लागली होती. भाजपच्या पूनम महाजन तेथून निवडून आल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत या मतदारसंघात कोणामध्ये लढत होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र संभाव्य उमेदवारांच्या नावांच्या चर्चेमध्ये प्रिया दत्त कुठे आहेत असा स्वभाविक प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. दत्त या लवकरच काँग्रेसला सोडचिट्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचीही चर्चा सुरु आहे. मात्र त्यांनी या सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत.
हेही वाचा – रायगडात शेकापला लागलेली गळती थांबेना
हेही वाचा – बीडमध्ये मराठा ध्रुवीकरणाचा शरद पवारांचा प्रयोग
प्रिया दत्त या भारतीय राजकारणातील आणि समाजकारणातील एक प्रसिद्ध चेहरा आहेत. माजी खासदार आणि अभिनेते सुनील दत्त यांची कन्या असलेल्या प्रिया दत्त यांनी स्थानिक स्तरावर केलेल्या सामाजिक कार्यामुळे आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेससोबत असताना केलेल्या कामामुळे त्यांची ओळख आहे. मात्र गेली किमान दहा वर्षे त्या सक्रिय राजकारणात नाहीत. नर्गिस दत्त फाऊंडेशनच्या माध्यमातून त्या सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या सुरु असलेल्या चर्चांना उत्तर म्हणून प्रिया दत्त यांनी समाज माध्यमांवर आपल्या कुटुंबासोबतचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. “सध्या मी ज्यांच्यासोबत जाणार आहे ते म्हणजे माझी मुले… तेही एका बहुप्रतीक्षित सुट्टीसाठी…. आत्तापुरता तरी हाच प्लॅन आहे…”, असे त्यांनी म्हटले आहे.