अण्णा हजारेंचा पंतप्रधान मोदींना सवाल
निवडणुकीच्या प्रचारात जनतेला दाखविलेली ‘अच्छे दिन’ची स्वप्ने अजूनही वास्तवाच्या आसपासदेखील नसल्याने आधीचे काँग्रेस आघाडी सरकार आणि मोदी सरकार यांच्यात कोणताच फरक जाणवत नाही, अशा कानपिचक्या समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या नववर्ष शुभेच्छापत्रातूनच दिल्या आहेत.
आपल्या तीन पानी पत्रात हजारे यांनी पंतप्रधान मोदी यांनी निवडणूक प्रचारकाळात दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देणारी यादीच मांडली असून, काळा पैसा परत आणण्याच्या किंवा भ्रष्टाचारमुक्त भारताच्या घोषणेचा दृश्य परिणाम अद्यापही दिसतच नसल्याची खंतही व्यक्त केली आहे. लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्त्यांचे योग्य पालन केले जाईल अशी अपेक्षा होती, पण त्याबाबतही निराशाच झाली असून केवळ त्या घोषणांची आठवण करून देण्यासाठी आपण हे पत्र लिहीत आहोत, असा हताश सूरही अण्णा हजारेंनी या पत्रातून लावला आहे. आजवर आपण पाठविलेली असंख्य पत्रे ज्याप्रमाणे केराच्या टोपलीत दाबून ठेवण्यात आली, तसेच या पत्राचेही होईल, याची आपल्याला जाणीव आहे. अर्थात प्रत्येक पत्रास पंतप्रधानांनी उत्तर द्यावे अशी आपली अपेक्षाही नाही व तसे शक्यदेखील नसते. मात्र, ज्या व्यक्तीने आपले उभे आयुष्य देशासाठी व समाजसेवेसाठी समर्पित केले त्याच्या पत्राचीही तीच गत व्हावी असे आपल्याला वाटत नाही, अशा शब्दांत हजारे यांनी या पत्रातून शेलक्या कानपिचक्याही दिल्या आहेत.
कुठे गेले ते ‘अच्छे दिन’?
लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्त्यांचे योग्य पालन केले जाईल अशी अपेक्षा होती
Written by लोकसत्ता टीम
First published on: 02-01-2016 at 03:05 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Where they went good day anna hazare