लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : वापरलेले सॅनिटरी पॅडस्, डायपर, कालबाह्य औषधे आदी नागरिकांच्या वैयक्तिक वापराशी संबंधित असलेल्या घरगुती स्वच्छताविषयक बाबींच्या संकलनासाठी महानगरपालिकेच्या घनकचरा विभाग ‘घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचऱ्यांचे संकलन’ (डोमेस्टीक सॅनिटरी अँड स्पेशल केअर वेस्ट कलेक्शन) सेवा सुरू करणार आहे. या सेवेसाठी विविध गृहनिर्माण संस्था, निवासी संकुल, ब्यूटी पार्लर, महिला वसतिगृह, शैक्षणिक संस्था आदी आस्थापनांना रितसर नोंदणी करावी लागणार असून या नोंदणीची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू करण्यात आली. घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचऱ्याच्या संकलनाची सेवा येत्या १ मेपासून प्रत्यक्षात सुरू करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
महानगरपालिका आयुक्त तसेच प्रशासक भूषण गगराणी यांच्या आदेशानुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात आणि उपआयुक्त किरण दिघावकर यांच्या देखरेखीखाली मुंबईतील घनकचरा व्यवस्थापनाच्या अनुषंगाने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच, निरनिराळे उपक्रमही राबविण्यावर भर देण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर, नागरिकांच्या वैयक्तिक वापराशी संबंधित कचरा संकलनाच्या उद्देशाने ‘घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचऱ्यांचे संकलन करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
मुंबईमध्ये सध्या दररोज सुमारे ७ ते ८ हजार टन घनकचरा निर्माण होतो. यापैकी ७० ते ८० टन कचरा हा वैयक्तिक स्वच्छतेशी संबंधित असतो. त्यामध्ये प्रामुख्याने वापरलेले सॅनिटरी नॅपकिन्स, डायपर्स, टॅम्पॉन्स, निरोध आणि इतर स्वच्छतासंबंधित बाबींचा तसेच लघवी, रक्त, लाळ, पू, विष्ठेने दुषित झालेला कापूस, बँडेज, कालबाह्य औषधी (इंजेक्शन, सुई, रेझर ब्लेड्स) आणि ब्युटी पार्लरमध्ये निर्माण होणारा कचरा (वॅक्सिंग स्ट्रिप्स, पीपीई) आदींचा समावेश असतो. हा अत्यंत घातक कचरा असला तरी बरेचदा त्याकडे दुर्लक्ष केले जाते आणि सामान्य घरगुती कचऱ्यामध्येच तो टाकले जातो. त्यामुळे, कचरा संकलित करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण होतो. तसेच, त्यावर प्रक्रिया करणे क्लिष्ट होते, असे किरण दिघावकर यांनी सांगितले. स्वच्छताविषयक विशेष काळजीयोग्य कचऱ्यांचे संकलन करण्यासाठी पिवळ्या रंगाच्या पिशव्यांचा वापर केला जाणार आहे. सेवेसाठी नोंदणी केलेल्या आस्थापनांना प्रत्यक्ष भेट देऊन कचऱ्याच्या विलगीकरणाबाबत जनजागृतीही केली जाईल, असेही दिघावकर यांनी नमूद केले.
नागरिकांमध्ये यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी तसेच त्यांचा सहभाग सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने महानगरपालिकेच्या वतीने २२ एप्रिलपासून नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. गृहनिर्माण संस्था, निवासी संकुले, ब्यूटी पार्लर, महिला वसतिगृहे व शैक्षणिक संस्था आदी आस्थापनांना या सेवेचा लाभ घेता येणार असून त्यांना https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSc6zR8XHoOzXRNanCCdj4oKtS27Iu7vuaXBANiCGoKCfUCn5g/viewform या लिंकवर नोंदणी करावी लागेल. दरम्यान, महापालिकेतर्फे मुंबईतील नोंदणीकृत आस्थापनांना व्हॉट्स ॲप, तसेच अन्य माध्यमातून क्यूआर कोड पाठविण्यात येत आहे. संबंधित क्यूआर कोड स्कॅन करूनही नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.