बाळासाहेबांची प्रकृती खालावल्याने ‘मातोश्री’बाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या पोलिसांना अखेर म्हाडाच्या कार्यालयात विश्रांतीसाठी आसरा घ्यावा लागला. मात्र शुक्रवारी म्हाडा कार्यालय सुरू असल्यामुळे तेव्हा कुठे आसरा घ्यायचा, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.
‘मातोश्री’बाहेर शिवसैनिकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दोन-तीन दिवसांपासून येथे तैनात असलेल्या पोलिसांची अवस्था बिकट बनली आहे. कमालीचा थकवा आलेल्या पोलिसांनी अखेर जवळच्याच म्हाडा कार्यालयात आश्रय घेतला होता. थोडी विश्रांती आणि प्रातर्विधी उरकून ते पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले. भाऊबिजेनिमित्त गुरुवारी म्हाडाला सुट्टी असल्यामुळे पोलिसांना तेथे आसरा घेता आला. मात्र शुक्रवारी म्हाडा कार्यालय सुरू राहणार आहे. त्यामुळे कुठे आसरा घ्यायचा असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.
कलानगर परिसरात हॉटेल नसल्यामुळे शिवसैनिक, पोलीस आणि पत्रकार भुकेने व्याकूळ झाले होते. काही मंडळींनी बिस्कीट, वडापाव, पोहे उपलब्ध केले. मात्र तेथे उपस्थितांची संख्या पाहता उपलब्ध करण्यात आलेले पदार्थ अपुरे पडले. त्यामुळे अनेकांना उपवास घडला. तसेच पिण्याचे पाणीही उपलब्ध नसल्यामुळे अखेर टँकर मागविण्यात आले. त्यातील पाणी बाटली भरून घेण्यासाठी अनेकजण गर्दी करीत होते. येथील बागेमध्येही उघडय़ावरच काहीजणांना आश्रय घेतला आहे. या परिसरात एकच सार्वजनिक प्रसाधनगृह असल्यामुळे तेथेही गर्दी झाली होती.    

Story img Loader