* ‘बारा बलुतेदार महासंघा’चा सवाल
* ओबीसींच्या धर्मातराचे समर्थन

ओबीसी समाजाला हिंदू धर्मात नव्हे राजकारणात जाच सहन करावा लागत आहे, हे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांचे विधान हस्यास्पद आहे. ते कोणत्या ओबीसींबद्दल बोलतात आणि जे स्वत: सत्ताधीश बनले आहेत त्यांना राजकारणात कसला त्रास सहन करावा लागत आहे, असा सवाल बारा बलुतेदार महासंघाने केला आहे.
ओबीसीमधील धनदांडग्या व प्रबळ जातींना धर्मात जाच नसेल; परंतु गरीब बारा बलुतेदार समाजाला पदोपदी आजही मानहानी सहन करावी लागत आहे. त्यांच्यासाठी राजकीय सत्ता अजून कोसो मैल दूर आहे. त्यामुळे ओबीसींनी धर्मातराची भूमिका घेतली तर ते योग्यच आहे, अशी प्रतिक्रिया महासंघाचे सल्लागार प्रा. प्रकाश सोनवणे यांनी व्यक्त केली आहे.
‘ओबीसींना धर्मात नव्हे राजकारणात जाच’ या ‘लोकसत्ता’मधील भुजबळ यांच्या मुलाखतीवर ओबीसींधील इतर समाज घटकांकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. भुजबळ यांनी ओबीसींच्या धर्मातरालाही विरोध केला आहे. राज्यात दोन वर्षांपूर्वी ‘बारा बलुतेदार महासंघा’ची स्थापना झाली असून दोनच महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत भव्य मेळावा घेण्यात आला होता. भुजबळांच्या ओबीसींबद्दच्या भूमिकेवर महासंघाने कडक टीका केली आहे.  भुजबळ म्हणतात त्याप्रमाणे हिंदू धर्मात माळी समाजाला त्रास झाला नसेल. परंतु, न्हावी, सुतार, लोहार, कुंभार, शिंपी, गुरव, भोई, बेलदार, धोबी, इत्यादी ओबीसींमधील गरीब बलुतेदार समूहाला सामाजिक मानहानी सहन करावी लागत आहे. त्याबद्दल भुजबळ यांना काही माहिती आहे का, अशी विचारणा त्यांनी केली आहे.