मुंबई: पूर्व उपनगरातील नागरिकांना लवकरच बेस्टचा गारेगार प्रवास अनुभवायला मिळणार आहे. बेस्टच्या तीन मार्गावर लवकरच वातानुकूलित गाड्या धावणार आहेत. त्यामुळे सध्या वाढत्या उष्म्याच्या पार्श्वभूमीवर बेस्टच्या प्रवाशांना काहीसा दिलासा मिळणार आहे. बेस्ट उपक्रमाने प्रवाशांसाठी उन्हाळ्याच्या तोंडावर दिलासादायक बातमी दिली आहे. बेस्ट उपक्रमाच्या बसताफ्यात नवीन वातानुकूलित बसगाड्यांचा टप्प्याटप्प्याने समावेश करण्यात येतो आहे. ओलेक्ट्रा कंपनीच्या खाजगी वातानुकूलित बस गाड्या बेस्टच्या ताफ्यात येत असल्याने बेस्ट मधील सध्याचे सर्वसाधारण बसमार्ग वातानुकूलित मध्ये रूपांतर करण्यात येणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून २७ मार्चपासून बेस्टने ७ मर्यादित, ५११ मर्यादित व सी ५३ या बस मार्गाचे रूपांतर वातानुकूलित बस मार्गामध्ये केले.

दरम्यान, एकेकाळी दिवसाला ४५ लाख प्रवासी घेऊन धावणाऱ्या बेस्टचे प्रवासी दिवसेंदिवस घटत चालले आहेत. बसताफा वाढवण्याचा संकल्प बेस्ट उपक्रमाने केलेला असला तरी हे उद्दीष्टय साध्य होऊ शकलेले नाही. जुन्या गाड्या भंगारात काढाव्या लागत असल्यामुळे गाड्यांची असलेली संख्याही कमी होऊ लागली आहे. त्यामुळे बसफेऱ्यांची संख्या घटली आहे. बसची वाट पाहून कंटाळलेले प्रवासी रिक्षा, टॅक्सीकडे वळत आहेत. त्यामुळे प्रवाशांची संख्या अजूनही रोडावते आहे. बसताफा कमी झाल्यामुळे नवीन वातानुकूलित गाड्या ताफ्यात समाविष्ट होण्यास विलंब झाल्यामुळे प्रवासी बससेवेकडे पाठ फिरवत आहेत.

या नवीन मार्गामध्ये ७ मर्यादित आता ए ७ या क्रमांकाने विजय वल्लभ चौक (पायधुनी) ते विक्रोळी आगार दरम्यान धावणार आहे. तर ५११ मर्यादित ही बस आता ए ५११ अशी घाटकोपर आगार ते नेरूळ बस स्थानक दरम्यान धावेल. घाटकोपर आगार ते कळंबोली दरम्यान धावणारी सी ५३ बस आता ए सी ५३ या क्रमांकाने धावेल. त्यामुळे पूर्व उपनगरातील प्रवाशांना उन्हाळ्यात दिलासा मिळणार आहे. ए ७ व ए ५११ या बसमार्गावर प्रत्येकी ८ बसगाडया धावणार असून सी ५३ या बसमार्गावर १४ बसगाड्या धावतील .

पहिली बस शेवटची बस

ए ७ विजय वल्लभ चौक पायधुनी ७. २०            २३. ३०

विक्रोळी आगार             ६. ००            २२. ००

ए ५११ घाटकोपर आगार           ०४. ०५ ००. ३०

 नेरुळ बस स्थानक             ०४. ४५ ०४. २५

ए सी ५३ घाटकोपर आगार     ६. ०० २०. ३०

कळंबोली                         ०७. १० २२. १०