भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके की दादासाहेब तोरणे हा वाद भारतीय चित्रपटाच्या शतसांवत्सरिक वर्षपूर्तीच्या पाश्र्वभूमीवर सुरूच असून दादासाहेब तोरणे यांची सून मंगल तोरणे आणि इम्पा संस्थेचे संचालक विकास पाटील यांनी यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका केली आहे. मंगळवारी एका पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती देण्यात आली.
पत्रकार परिषदेला विकास पाटील यांच्यासह दादासाहेब तोरणे यांचे दोन पुत्र अनिल व विजय तसेच चित्रपट अभ्यासक शशिकांत किणीकर, फिरोज रंगूनवाला उपस्थित होते.
तोरणे यांनी बनविलेला ‘पुंडलिक’ हा चित्रपट १८ मे १९१२ रोजी प्रदर्शित झाला होता याचे पुरावे सादर करण्यात आले आहेत.
या चित्रपटाची निगेटिव्ह इंग्लंडमध्ये प्रक्रियेसाठी पाठविण्यात आली होती. ती मूळ निगेटिव्ह परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून भारतात आणावी. कारण ती देशाची मालमत्ता आहे. तसेच केंद्र सरकारने दादासाहेब तोरणे यांना ‘पायोनियर ऑफ इंडियन सिनेमा’ असे संबोधित करून त्याची प्रसिद्धी करावी, आदी मागण्या जनहित याचिकेद्वारे करण्यात आल्या आहेत.
दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपटाचे जनक किंवा ‘फादर ऑफ इंडियन सिनेमा’ म्हटले जाते. तसेच त्यांच्या नावाने पुरस्कार दिला जातो. त्याचप्रमाणे दादासाहेब तोरणे यांना ‘पायोनिअर ऑफ इंडियन सिनेमा’ असे संबोधावे आणि त्यांच्या नावानेही सरकारने पुरस्कार द्यावा, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.
मुंबईतील कॉरोनेशन चित्रपटगृहात १९१२ साली ‘पुंडलिक’ प्रदर्शित करण्यात आला. त्यानंतर एक वर्षांने ३ मे १९१३ रोजी फाळके यांचा ‘राजा हरिश्चंद्र’ याच चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला होता, अशी माहितीही या वेळी देण्यात आली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा