बीएमसी स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांची चौकशी करणाऱ्या आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना कोट्यवधी रुपयांच्या संशयास्पद व्यवहारांची माहिती असलेली डायरी सापडली आहे. अधिकार्‍यांना या डायरीत ५० लाख रुपयांचे घड्याळ आणि ‘मातोश्री’ला २ कोटी रुपयांची आणखी भेटवस्तू दिलेल्या नोंदी सापडल्या आहेत. मात्र, यशवंत जाधव यांनी डायरीतील नोंदींमध्ये ‘मातोश्री’ हा आपल्या आईचा उल्लेख असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, यावर भाजपाचे प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया देत चौकशीची मागणी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यशवंत जाधवांनी ‘मातोश्री’ला कोट्यवधींच्या भेटवस्तू दिल्या; आयकर विभागाला आढळल्या नोंदी

“करोना काळात ३०० कोटी रुपयांच्या ३८ मालमत्ता खरेदी करणाऱ्या यशवंत जाधव यांच्या डायरीमध्ये कोट्यवधी रुपयांच्या भेटवस्तू मातोश्रीला दिल्याच्या नोंदी सापडल्या आहेत. या सगळ्याची चौकशी ईडीच्या माध्यमातून झाली पाहिजे, ही भाजपाची मागणी आहे. मुंबईकर जनतेचे लुटलेले पैसे परत मुंबईकरांना मिळाली पाहिजे. तसेच ही मातोश्री कोण, बंगला की बंगल्यातली माणसं की अन्य कोणी, या सगळ्याची सखोल चौकशी करावी, अशी आमची मागणी आहे. अन्यथा आम्ही मोठं आंदोलन उभारू” असा इशारा अतुल भातखळकर यांनी दिला.

मनसेची टीका –

“यशवंत जाधव यांनी दिलेल्या कोट्यवधींच्या भेटवस्तू या फार छोट्या गोष्टी आहेत. कारण ते ४० हजार कोटींच्या महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. गेल्या २५ वर्षांपासून शिवसेना सातत्याने महापालिकेत सत्तेत आहे. त्यामुळे जाधवांच्या आधी असलेल्या स्थायी समितीच्या अध्यक्षांनी मातोश्रीवर काय काय पोहोचवलं, मातोश्री कशी उभी राहिली, हे मुंबईकरांच्या लक्षात येईल,” अशी टीका मनसे प्रवक्ते हेमंत कांबळे यांनी केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is matoshree asks atul bhakhalkar after yashwant jadhav gifts hrc