शंभर कोटी क्लबमध्ये यावर्षी १० चित्रपट, आमिरचा ‘तलाश’ सलमानच्या ‘एक था टायगर’चे रेकॉर्ड मोडणार का? मग सलमानचा ‘दबंग’ २०० कोटीपर्यंत पोहोचणार का? एक ना अनेक प्रश्न. अशा प्रश्नांच्या गणिती उत्तरांवरच बॉलिवूडच्या आर्थिक उलाढालीचे आणि कलाकारांच्या यशाचे मोजमाप केले जात आहे. आणि म्हणूनच ‘एक था टायगर’ने प्रदर्शित झाल्या झाल्या एकाच दिवसात ३२.९२ कोटी रुपये नफा कमावून रेकॉर्ड कायम केला तरीही या चित्रपटाला देशांतर्गत २०० कोटीचा नफा करता आला नाही म्हणून सलमान २०० कोटी क्लबचा नायक नाही. तर आमिरच्या ‘थ्री इडियट्स’ने देशभरात एकूण २०२ कोटी रूपयांची कमाई केली म्हणून तो एकटा २०० कोटीचा नायक असे निकष बॉलिवूडमध्ये बांधले जात आहेत. ‘यात मी अजून या क्लबमध्ये एकटाच आहे’, असे म्हणत ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खानने आपल्या सहकलाकारांना आव्हान देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
आमिर खानचा ‘थ्री इडियट्स’ तीन वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने आजपर्यंत देशात आणि परदेशात मिळून ३८५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यानंतर तीन वर्षांनी सलमान खानचा ‘एक था टायगर’ प्रदर्शित झाला. या चित्रपटाने सगळ्यात शंभर कोटी रुपयांची कमाई करण्यासाठी सगळ्यांपेक्षा कमी दिवस घेण्याचा रेकॉर्ड केला. मात्र, एका महिन्यानंतर ‘राझ ३’, ‘हिरॉईन’ हे चित्रपट प्रदर्शित झाले. आणि त्यामुळे टायगरचा वेग मंदावला. तरीही या चित्रपटाने आजवर देश आणि परदेशात मिळून ३०७ कोटी रुपयांची कमाई केली आहे.  असे असूनही केवळ या चित्रपटाला देशात २०० कोटी रुपये नफा कमावता आला नाही म्हणून सलमानची गणना २०० कोटी क्लबमध्ये झालेली नाही. यात आमिरनेही ‘मला आश्चर्य वाटते की तीन वर्ष झाली तरी माझा रेकॉर्ड कोणाला मोडता आलेला नाही’, असे वक्तव्य करत नवा वाद सुरू केला आहे.
‘खरेतर ‘थ्री इडियट्स’ प्रदर्शित झाला तेव्हापेक्षा आता चित्रपटगृहांची संख्याही वाढली आणि तिकिटांचे दरही वाढले आहेत. तरीही २०० कोटीचा टप्पा कोणाला पार करता आलेला नाही हे विचित्र आहे’, असे आमिरने म्हटले आहे. ‘आपल्याकडे  कलाकारांच्या यशाचे मोजमाप करताना त्यांच्या चित्रपटांनी देशभरात केलेली कमाई लक्षात घेतली जाते. या निकषावर सलमानचा ‘एक था टायगर’ अगदी एका टक्क्याने मागे पडला आहे. ‘एक था टायगर’चा देशभरात कमावलेला नफा १९९.४ कोटी रुपये एवढी आह.े तर आमिरच्या ‘थ्री इडियट्स’ची कमाई २०२ कोटी रुपये आहे. त्यामुळे साहजिकच सलमानला दोनशे कोटीचा नायक म्हणता येणार नाही’, असे ट्रेड विश्लेषक तरन आदर्श यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले आहे. त्यामुळे ‘वॉंटेड’,‘दबंग’, ‘रेडी’, ‘बॉडीगार्ड’ असे एकापाठोपाठ एक शंभर कोटी रूपये नफा मिळवणारे चित्रपट देऊनही सलमानला दोनशे कोटी क्लबची दारे उघडण्यासाठी ‘दबंग २’ चा जुगार खेळावा लागणार आहे.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा