जप्त गाडय़ांबाबतच्या सूचना पोलिसांनीच धुडकावल्या
लपाछपी खेळताना घाटकोपरच्या दामोदर पार्क येथे उभ्या असलेल्या गाडीमध्ये जाऊन लपलेल्या पाच वर्षीय कुर्बान खानचा गाडीचे दार बंद झाल्याने घुसमटून मृत्यू झाला. ‘गुन्हे शाखा कक्ष ७’ने काही महिन्यांपूर्वी फसवणुकीच्या गुन्हय़ात जप्त केलेल्या तवेरा गाडय़ांपकी एका गाडीत कुर्बान जाऊन लपला. विविध गुन्हय़ात सापडलेल्या, बेवारस गाडय़ा पोलीस ठाणे किंवा अन्यत्र उभ्या करून ठेवू नका, त्याचा शक्य तितक्या लवकर निपटारा करा, अशा स्पष्ट सूचना देऊनही पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे चिमुरडय़ाला आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळे पोलिसांवर निष्काळजीपणाचा गुन्हा का दाखल होऊ नये, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
पंकेशा दर्गा येथे राहायला असलेला कुर्बान खान आपल्या मित्रांसोबत शनिवारी दुपारी लपाछपी खेळत होता.
खेळताना कुणालाही सापडू नये म्हणून दामोदर पार्क येथे उभ्या असलेल्या १५-१६ तवेरा गाडय़ांच्या दिशेला तो धावत गेला. त्यातील एका गाडीचा दरवाजा उघडा दिसल्याने तो पटकन आत शिरला आणि त्याने गाडीचा दरवाजा बंद केला. मात्र, गाडीचा दरवाजा पुन्हा उघडता न आल्याने त्याचा घुसमटून मृत्यू झाला. केवळ आपली कागदपत्रे देऊन त्याच्यावर गाडय़ा विकत घेऊन त्यातून दलाली मिळवून देण्याचे आमिष दाखवून तवेरा गाडय़ा विकत घेतलेल्या भामटय़ाला ‘गुन्हे शाखेच्या कक्ष ७’ने काही महिन्यांपूर्वी बेडय़ा ठोकल्या होत्या. त्याने बँकांकडून कर्ज घेऊन विकत घेतलेल्या या गाडय़ा पोलिसांनी दामोदर पार्क येथे उभ्या केल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून त्या तिथेच पडून आहेत. अपघातग्रस्त किंवा एखाद्या गुन्हय़ात गुन्हेगारांनी वापरलेले वाहन जप्त केल्याचा पुरावा म्हणून पोलीस त्या जमा करतात. अशा अनेक गाडय़ा शहरातील पोलीस ठाण्यांच्या आवारात पडलेल्या दिसून येतात. या गाडय़ांचा वापर समाजकंटक किंवा अन्य लोक करू शकतात. तसेच, त्यामुळे परिसराला बकाल रूप येत असल्याने नोव्हेंबर २०१५ मध्ये पोलीस सहआयुक्त देवेन भारती यांनी अशा गाडय़ांचा लवकरात लवकर निपटारा करण्याचे आदेशच जारी केले होते.
गाडय़ा वारसांपर्यंत पोहोचवाव्यात किंवा न्यायालयाकडून परवानगी घेऊन त्यांचा लिलाव करावा, असेही आदेशात स्पष्ट म्हटले होते. मात्र गुन्हे शाखा किंवा स्थानिक पोलिसांनी या आदेशाकडे दुर्लक्ष केल्यानेच रस्त्यात धूळ खात उभ्या असलेल्या गाडीत कुर्बान लपला आणि त्याला जीव गमवावा लागला. वरिष्ठांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलिसांवर आता कोणती कारवाई होणार, त्यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवला जाणार का, असे प्रश्न विचारण्यात येत आहेत.

Story img Loader