महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. महाविकास आघडीचे सरकार जाऊन आता सात महिन्यांचा कालावधी लोटला आहे. पुढच्या निवडणुकीला देखील दीड वर्षांचा अवधी बाकी आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीची गणितं अद्याप सुटलेली नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना मात्र आपला नेताच पुढचा मुख्यमंत्री होणार! हे ठरविण्याची घाई लागलेली दिसते. मागच्या महिन्याभरात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि आता खासदार सुप्रिया सुळे यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ असे बॅनर लागलेले आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र या बॅनरवरुन तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हे वाचा >> शरद पवारांना फडणवीस मुख्यमंत्री म्हणून नको होते? कोण खरं बोलतंय बावनकुळे की फडणवीस? राष्ट्रवादीचा सवाल

रातोरात तो बॅनर हटविला

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्यालय मुंबईच्या बेलार्ड इस्टेट या भागात आहे. या कार्यालयाच्या बाहेर काही दिवसांपूर्वी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे “महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री, एकच वादा, अजित दादा!” असा मोठा कटआऊट लागला होता. या बॅनरवरुन प्रश्न विचारले जाताच. तात्काळ हा बॅनर तिथून हटविण्यात आला होता. त्यानंतर आता त्याच ठिकाणी रात्री “सुप्रिया सुळे, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री” असा कटआऊट लावण्यात आला होता. पक्षात गदारोळ झाल्यानंतर सकाळी हा बॅनर प्रदेश कार्यालयाच्या बाहेरून हटविण्यात आला आहे.

आमच्याविरोधात कुणीतरी कट रचतंय – सुप्रिया सुळे

खासदार सुप्रिया सुळे यांना याबाबत प्रश्न विचारला असता त्या चांगल्याच संतापल्या. “आज माझा फोटो लावला आहे, उद्या तुमच्या घरातील मुलींचा फोटो लावला जाऊ शकतो. माझी मुंबई पोलिसांना विनंती आहे की, दादांचा आणि माझा फोटो कोण लावतंय? पहाटेच हा बॅनर का लागला जातो? त्याच्यापाठी कोण आहे? याची चौकशी झाली पाहीजे. आमच्या दोघांच्या सुरक्षिततेचा हा प्रश्न आहे.”, अशी संतप्त प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली. जयंत पाटील यांच्यासाठी लागलेले बॅनर हे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी लावले होते. मात्र माझा आणि दादांसाठी लावलेल्या बॅनरवर कुणाचेही नाव नाही. तसेच कटआऊटची पद्धतही सारखीच आहे, त्यामुळे याच्यामागे कोण आहे, याचा शोध पोलिसांनी घ्यावा, असेही आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

आमच्यात स्पर्धा नाही – अजित पवार

विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा भावी मुख्यमंत्री असा बॅनर लागल्यानंतर त्यांनाही याबाबत विचारण्यात आले होते. यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, “असे फ्लेक्स लावणाऱ्यांना फार महत्त्व देऊ नका. उद्या कुणाचेही असे फ्लेक्स लावले जाऊ शकतात. आमच्यात कोणतीही स्पर्धा नाही. तुम्ही (माध्यमे) फार मनावर घेऊन नका, याला महत्त्व देऊ नका. जोपर्यंत विधानसभेत १४५ चे संख्याबळ होत नाही, तोपर्यंत काहीही होऊ शकत नाही. कार्यकर्ते अतिउत्साही असतात त्यात ते असे फ्लेक्स लावून त्यांचे वैयक्तिक समाधान करुन घेतात. उद्या कुणीही भावी पंतप्रधान म्हणून बॅनर लावेल पण त्याने काही होत नाही.”

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is the next cm of maharashtra poster war in ncp supriya sule banner flash after ajit pawar and jayant patil kvg