Who was Mauris Noronha :अभिषेक घोसाळकर या माजी नगरसेवकाच्या हत्येने दहिसर हादरलं आहे. मॉरिस नोरोन्हा उर्फ मॉरिसभाईने घोसाळकर यांना कार्यालयात बोलवलं. त्यांच्यासह फेसबुक लाईव्ह केलं आणि त्यानंतर त्याने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्या. अभिषेक घोसाळकर यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी करुणा रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र त्यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. अशात मॉरिसने स्वतःवरही गोळ्या झाडल्या आणि आत्महत्या केली. सोशल मीडियावर सध्या मॉरिस नोरोन्हा उर्फ मॉरिसभाई कोण होता याची चर्चा रंगली आहे. आपण जाणून घेऊ कोण होता मॉरिस नोरोन्हा?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मॉरिस नोरोन्हाने गोळीबार केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मॉरिसने स्वतःवर गोळ्या झाडल्या आणि आत्महत्या केली. तो स्वयंघोषित नेता आणि सामाजिक कार्यकर्ता होता. मॉरिस नोरोन्हावर गंभीर गुन्ह्यांचीही नोंद आहे.

मॉरिस नोरोन्हावर गंभीर गुन्हे

मॉरिस नोरोन्हावर गंभीर गुन्हा दाखल आहेत. ८० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे. तसंच महिलेवर बलात्कार केल्याचा गुन्हाही त्याच्यावर दाखल आहे. दोन हत्यांचे गुन्हे त्याच्यावर दाखल होते. धमकी देण्याचा गुन्हाही दाखल केला गेला आहे. दोन वर्षांपूर्वी ४८ वर्षीय महिलेच्या तक्रारीनंतर मॉरिसविरोधात पोलिसांनी ब्लॅकमेलिंग, बलात्कार, फसवणूक आणि धमक्या देणं या आरोपांखाली लुक आऊट नोटीसही जारी केली होती. तसंच त्यानंतर त्याला अटकही झाली होती.

हे पण वाचा- “…आणि मॉरिसने अभिषेक घोसाळकरांवर गोळ्या झाडल्या”, प्रत्यक्षदर्शी लालचंद पाल यांनी सांगितला थरार

मॉरिसभाई नावाने फेसबुक पेज

मॉरिस नोरोन्हानचं फेसबुक पेज मॉरिसभाई नावाने आहे. तो स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ता होता. त्याला लोक मॉरिसभाई म्हणायचे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस यांच्यात वाद सुरु होता. मॉरिसचे अनेक नेत्यांबरोबर फोटो व्हायरल होत आहेत. कोव्हिडच्या काळात सामाजिक कार्य केल्याबद्दल त्याला पुरस्कारही मिळाले आहेत. जे त्याने फेसबुकवर पोस्ट केले आहेत. मिड-डेने या विषयीचं वृत्त दिलं आहे.

मॉरिस आणि घोसाळकर यांच्यात टोकाचा वाद

समोर आलेल्या माहितीनुसार अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस यांच्यात एक वर्षापूर्वी टोकाचा वाद झाला होता. मात्र त्यांचातला वाद मिटला आणि पुन्हा मैत्री झाली होती. मात्र ही नव्याने झालेली मैत्री दोघांच्याही जिवावर बेतली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who was mauris noronha who killed shivsena ubt abhishek ghosalkar scj
Show comments